Milk Price News : सध्या राज्यात दूध दराच्या (Milk Price) मुद्यावरुन वातावरण चांगलच गरम झाल्याचं पाहायला मिळत आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांसह विविध शेतकरी संघटना आक्रमक होताना दिसत आहेत. दुधाच्या दरात वाढ करावी ही मागणी करत आहेत. दरम्यान, याच मुद्यावर तोडगा काढण्यासाठी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी दूध दरासंदर्भात महत्वाची बैठक होणार आहे. ही बैठक विधीमंडळात होणार आहे. 


खासगी-सहकारी दूध महासंघाच्या प्रतिनिधींसह दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार 


दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दूध दरवाढी संदर्भात दूध प्रकल्प प्रतिनिधी व दुध उत्पादक शेतकरी यांची महत्वाची बैठक होणार आहे. शनिवारी विधानभवनात होणाऱ्या या बैठकीत दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या जाणून त्यावर तोडगा काढला जाणार आहे. या बैठकीला राज्यातील खासगी तसेच सहकारी दूध महासंघाचे प्रतिनिधी, दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. या बैठकीत शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेत त्यावर सविस्तर चर्चा करण्यात येईल. तसेच या बैठकीचा अहवाल मंत्रीमंडळासमोर सादर करण्यात येणार आहे.


दूध उत्पादक शेतकरी अडचणीत


सध्या राज्यातील दुध उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. कारण दुधाच्या दरात सातत्यानं घसरण होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. याविरोधात विविध शेतकरी संघटनांसह किसान सभा (Kisan sabha) आक्रमक होताना दिसत आहे. सध्या दुधाला कुठं 25, तर कुठं 26 रुपयांचा दर मिळत आहे. यामुळं शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यामुळं सरकारनं तातडीनं याची दखल घेऊन दुध उत्पादकांना दिलासा द्यावा, अन्यथा पुन्हा एकदा एल्गार करावा लागेल असा इशारा विविध शेतकरी संघटनांनी दिला आहे.


पशुखाद्याचे दर वाढले, दुधाचे दर कमी झाले


राज्यात पशुखाद्याचे दर सातत्याने वाढत आहेत. राज्यातील अनेक भागात चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. औषधोपचार व अनुषंगिक खर्च वाढल्याने दुधाचा उत्पादन खर्च सहन करण्याच्या पलीकडे गेला आहे. राज्य सरकार व राज्याचे दुग्धविकास मंत्री मात्र अजूनही निवडणुकीच्या माहोलमधून बाहेर येताना दिसत नाहीत. अशा पार्श्वभूमीवर अखेर दुध उत्पादकांना तीव्र आंदोलना शिवाय पर्याय राहणार नसल्याची भूमिका दूध उत्पादक शेतकऱ्यांसह शेतकरी नेते मांडत आहेत.  


महत्वाच्या बातम्या:


दुधाला 34 रुपये दर देण्याच्या विखे पाटलांच्या घोषणेचं काय झालं? दुध उत्पादकांना दिलासा द्या, अन्यथा पुन्हा एल्गार, किसान सभा आक्रमक