Strict Action Against Illegal Pubs, Bars: ठाणे : ठाणे (Thane News) आणि मिरा-भाईंदर (Mira Bhayandar) शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी शहरातील बेकायदेशीर पब्ज, बारवर कठोर कारवाई करावी. तसेच, शहरातील अमली पदार्थांशी निगडित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवून ती नष्ट करण्यात यावीत, असं स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दोन्ही शहरांचे महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांना आज दिलं.
पुण्यात काही तरुण अमली पदार्थांचे सेवन करत असल्याचं नुकतंच निदर्शनास आलं होतं. याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री शिंदे यांनी पुणे पोलीस आयुक्त आणि मनपा आयुक्तांना तेथील अमली पदार्थांशी संबंधित अनधिकृत बांधकामं बुलडोझर लावून नष्ट करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पुणे शहरामध्ये या संदर्भात व्यापक कारवाया करण्यात आल्या. आता तशाच पद्धतीनं ठाणे शहर आणि मीरा-भाईंदर शहरातील अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामं ही बुलडोझर लावून नष्ट करण्यात यावीत, अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत.
अमली पदार्थांमुळे तरुणाईचं मोठं नुकसान होत आहे. हा विळखा तातडीनं रोखणं महत्त्वाचं आहे. यासाठी अत्यंत कडक उपाय योजण्यात यावेत. अमली पदार्थ विक्रेत्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरू करावी. शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय योजावेत, असे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.
अवैध पबवर बुलडोझर चालवा, पुण्यातील अवैध पबच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना शहरातील अवैध पबच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय अवैध पबसह बांधकाम नियमांचे उल्लंघन केल्या जाणाऱ्या अन्य इमारतींवरही बुलडोझर चालवावेत असे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या विधानात म्हटलेय की, पुणे शहराला 'नशा मुक्ती शहर' बनवण्यासाठी तस्करांच्या विरोधात नव्याने कारवाई सुरू करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
पुणे पोलिसांचा अंत पाहू नका : अमितेश कुमार
पुणे पोलिसांचा अंत पाहू नका. सुरुवातीला हात जोडू पण संयम तुटला तर कडक कारवाई करु असा सज्जड दम पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. तर L3 बारमधील अंमली पदार्थांचं सेवन करणाऱ्यांवर आणि अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर एनडीपीएस कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.