कोल्हापूर: कोल्हापुरात ऊसाच्या दरासंदर्भात बैठक निष्फळ ठरली आहे. कारण, स्वाभिमानी शेतकरी संघटना एफआरपी 3200 रुपयांपर्यंत वाढवून देण्याच्या मागणीवर ठाम आहे. मात्र, साखर कारखानदारांनी त्याला नकार दर्शवला आहे.
उसाच्या दरासंदर्भात कोल्हापुरात झालेल्या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, सरकारकडून चंद्रकांत पाटील आणि साखर कारखानदारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कारखानदारांनी एकरकमी एफआरपी देण्याची तयारी दाखवली. मात्र, राजू शेट्टींनी ऊसाची पहिली उचल 3200 रुपये देण्याची मागणी केल्याने ही बैठक निष्फळ ठरली.
गेल्यावर्षी एफआरपीप्रमाणे ऊसाला भाव मिळाला नव्हता, त्यामुळे यंदा ऊसाला 3200 रुपयांची एककलमी पहिली उचल द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी जयसिंगपूरमधील ऊस परिषदेत केली होती.
3500 रुपयांची पहिली उचल द्या: शिवसेना
दरम्यान, या वादात शिवसेनेनंही उडी घेतली असून कारखानदारांचे दलाल बनलेल्या राजू शेट्टींनी फक्त 3200 रुपयाचा भाव मागून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप शिवसेनेनं केला होता. तसेच पहिली उचल 3500 रुपये मिळाली पाहिजे यासाठी 4 नोव्हेंबरला बळीराजा संघटना आणि शिवसेना रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.
बागायतदारांची व्याख्या बदला
तर दुसरीकडे महाराष्ट्रातील बागायतदार शेतकऱ्यांची व्याख्या बदलण्याची गरज असल्याचं मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. सध्या महाराष्ट्रातील 81 टक्के शेतकऱ्यांकडे फक्त 2 एकर जमीन आहे. मग 2 एकर ऊसाचं पीक घेणारा बागायतदार कसा? असा सवाल पवारांनी केला.
दरम्यान, 5 नोव्हेंबर पूर्वी कारखानदार आणि शेतकरी संघटनामध्ये तोडगा निघेल, असं आश्वासन चंद्रकांत पाटलांनी दिलं आहे.
संबंधित बातम्या
सरकार तुमचंच, मागा चार हजार, अजित पवारांचा शेट्टींना टोला