यवतमाळ : कोरोना व्हायरसनं जगभर अक्षरश: थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढते आहे, तर मृत्यूचं प्रमाणही वाढत आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी जगभरात त्यावर औषधाचा शोध सुरु आहे. मात्र अद्याप कुणालाही म्हणावं तसं यश मिळालेलं नाही. आता यवतमाळचे डॉक्टर प्रशांत चक्करवार यांनी अस्थमा (दमा) रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरलं जाणारं अत्यंत स्वस्त औषध 'मोंन्टेलुकास्ट' हे कोरोनाबाधित रुग्णांचा जीव वाचवू शकते, असा अभ्यासाअंती निष्कर्ष काढला आहे .


या संशोधनाबाबत भारत सरकारने आणि ICMR ने यात पुढाकार घ्यावा यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना डॉ. चक्करवार यांनी पत्रव्यवहार केला आहे. त्यांचाही याला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने यावर काम करण्याची गरज असल्याचे डॉ. प्रशांत चक्करवार यांचे म्हणणे आहे .


डॉ प्रशांत चक्करवार यांनी याबाबत ICMR चे डॉ. रमण गंगाखेकर यांना पत्रव्यवहार केला. त्यानंतर तेथील एका रिसर्च समितीचे डॉ. जेरील चेरियन यांनी डॉ प्रशांत चक्करवार यांना पत्र लिहून यावर रिसर्च रिपोर्टचा डेटा आम्हाला द्या, असं कळवलं आहे. मात्र एवढी यंत्रणा उभी करणे यवतमाळसारख्या ठिकाणी शक्य नाही. त्यामुळे सरकारने यात क्लिनिकल प्रॅक्टिस करून हे मोंन्टेलुकास्ट औषध कोरोना रुग्णांसाठी वापरले तर यातून नक्की फायदा होईल, असं डॉ, चक्करवार यांनी म्हटलं आहे.


स्वतः डॉ प्रशांत चक्करवार यांच्या घरी अस्थमाचे पेशंट आहेत. त्यामुळे ते औषध कसं काम करतं याची माहिती त्यांना आधीपासून होतीच. मात्र कोरोना आजारात रुग्णांसाठी हे जेनेरिक औषध कमी किमतीत प्रभावी उपाय ठरु शकतं, असं डॉ, प्रशांत चक्करवार यांना अभ्यासअंती वाटत आहे. त्यावर आता केंद्रीय आरोग्य यंत्रणा काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


Lockdown Again? गर्दी वाढली तर महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा गर्भित इशारा