पिंपरी चिंचवड : वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विवाहित महिलेने स्वतःला पेटवून घेतल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. तिला वाचवण्याच्या प्रयत्नात डॉक्टर पती देखील भाजला आहे. ही घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली. या घटनेत पत्नी योगिता चौधरी या 95 टक्के तर पती डॉ चेतन चौधरी 20 टक्के भाजले आहेत.


माहितीनुसार, चिंचवड येथे डॉ चेतन चौधरी आणि योगिता चौधरी हे पती-पत्नी आणि सासू-सासरे एकाच घरात राहतात. लग्नाला नऊ वर्ष झालेल्या या दोघांना एक सात वर्षाचं मूल आहे. मात्र या दोघांमधील वादविवाद काय थांबत नव्हते. यातूनच एकाच घरात राहून पती-पत्नी आणि सासू-सासरे वेगवेगळा स्वयंपाक करू लागले.

उतार वयात सासू काम करू शकत नसल्याने एक बाईला त्यांनी कामाला ठेवलं होतं. शुक्रवारी योगिताला स्वयंपाक करण्याचा कंटाळा आल्याने तिने त्या बाईला चपात्या करायला सांगितल्या. पण त्या बाईने ठरलंय तितकंच काम करेन असं सासू रजनी यांना सांगून निघून गेली. यावर सासूने तिला चपाती करू न दिल्याचा अर्थ लावत योगिता यांनी सासू-सासऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.

यामुळे आधीच डोळ्यांची शस्त्रक्रिया झालेल्या सासऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. मग संतापलेल्या पती चेतन यांनी चिंचवड पोलीस स्टेशन गाठत पत्नी विरोधात तक्रार दिली. त्यानंतर सामंजस्याने प्रकरणावर पडदा टाकण्यात आला. मात्र घरी गेल्यावर वादाला पुन्हा तोंड फुटलं. पती, सासू आणि सासऱ्यांनी दिलेल्या तक्रारींमुळे योगिता यांचा देखील पारा चढलेला होता.

घटनेवेळी सासऱ्यांवर उपचार सुरू असल्याने सासू रुग्णालयात तर पती कामानिमित्त बाहेर होते. मग योगितांनी मुंग्या मारण्याचे औषध पाण्यात टाकून प्राशन केले. त्याआधी दुकानात जाऊन रॉकेल आणले. औषधाने पोटात मळमळू लागल्याने तिने पतीला बोलवून घेतले. घरी आलेल्या पती डॉक्टरने योगिता यांना मारहाण केली. यावेळी पतीने थोडं पत्नीच्या तर थोडं स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतले. हातात काडीपेटी ही घेतली, मात्र पती मारून टाकले या भीतीने पत्नीने काडीपेटी हिसकावून घेतली आणि स्वतःला पेटवून घेतलं.
अंगावर रॉकेल असल्याने क्षणातच त्या आगीच्या लपेट्यात आल्या. यावेळी पती वाचवायला गेले असता ते ही चांगलेच भाजले.  पत्नी योगिता 95 टक्के तर पती चेतन 20 टक्के भाजले. या दोघांवर पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून अद्याप कोणास ही अटक करण्यात आलेली नाही.