नागपूर  : महाराष्ट्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर (Maharashtra Corona Update) वैद्यकीय परीक्षा (Medical Exam) ऑफलाईन होणार असल्याचं निश्चित झालं आहे. या परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांना RTPCR टेस्ट निगेटिव्ह असणं बंधनकारक असणार आहे. हा नियम राज्यात 173 कॉलेजेसचे 44000 डॉक्टर होऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना लागू असणार आहे. पहिल्या पेपरपर्यंत शक्य झाले नाही तर दुसऱ्या पेपरच्या आत मात्र टेस्ट निकाल आणावे लागतील, असं मुंबई उच्च न्यायालयाचं नागपूर खंडपीठानं सांगितलं आहे. 


कोरोना प्रादुर्भावामुळे अनेक विषयांच्या पदवी परीक्षा रद्द अथवा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या आहेत. यावर आता वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांनीही परीक्षा रद्द किंवा ऑनलाईन पद्धतीने घेण्याची मागणी केली जात होती. मात्र, वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लेखी तसेच प्रात्यक्षिक परीक्षा रद्द करणे किंवा ऑनलाइन घेणे नियमाला अनुसरून नाही आणि न्यायालयानेही त्यास परवानगी दिलेली नाही, त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी ही बाब समजून घेऊन परीक्षेला सामोरे जाण्यासाठी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी याआधीच केले होते.  


 Medical exam 2021 | वैद्यकीय परीक्षा रद्द होणार नाही, विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावं : वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख


10 जूनपासून वेळापत्रकानुसार परीक्षा होणार


प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात देशमुख यांनी सांगितलं होतं की, 2 जूनपासून सुरू होणाऱ्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलून त्या 10 जूनपासून घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. कोविड 19 प्रादुर्भावात वाढ न झाल्यास त्या परीक्षा सुरक्षित वातावरणात पार पाडण्याचे नियोजन आरोग्य विद्यापीठ व वैद्यकीय महाविद्यालयांनी केले आहे. वास्तविक पाहता वैद्यकीय महाविद्यालयाकडून शिक्षण घेणारे विद्यार्थी भविष्यात डॉक्टर होवुन जनतेच्या आरोग्याची काळजी घेणार आहेत. अशा अत्यंत महत्वाच्या क्षेत्रात भविष्यात काम करण्याची जबाबदारी घेणाऱ्या विदयार्थ्यांच्या परीक्षा रद्द करणे किंवा ऑनलाईन घेणे संयुक्तिक ठरत नाही, असं देशमुखांनी सांगितलं होतं.


त्यांनी म्हटलं होतं की, केंद्रीय नियामक मंडळालाही ते मान्य नाही. शिवाय उच्च न्यायालयानेही ही बाब नाकारली आहे. त्यामुळे परीक्षा घेणे अनिवार्य ठरते आहे. एकंदरीत या पार्श्वभुमीवर सर्व विद्यार्थ्यांनी आपले लक्ष अभ्यासावर केंद्रित करून परीक्षेला सामोरे जाणे हिताचे ठरणार आहे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, प्राचार्य, प्राध्यापक यांनीही या संदर्भाने विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांना मार्गदर्शन करावे परीक्षेसाठी त्यांना प्रेरीत करावे असे आवाहन देशमुख यांनी केले होते.


मागच्या वर्षातील कोरोनाचे संकट असताना महाराष्ट्र आरोग्य विदयापीठाने परीक्षा यशस्वीरीत्या घेतली असून त्या सुरक्षित वातावरणात पार पडल्या आहेत. 10 जूनपासून वेळापत्रकानुसार होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना संपुर्णतः कोवीड 19 सुरक्षा कवच पुरवले जाणार असून त्यांच्या आरोग्याची सर्वेातोपरी काळजी घेतली जाणार आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी करावी, असं आवाहन देशमुखांनी केलं होतं.