वर्धा : रुग्णालयातून कोरोनाबाधित रुग्णांच्या तब्येतीची माहिती मिळत नसल्याने कुटुंबिय, नातलग अस्वस्थ असतात. त्यांना मोठ्या मानसिक तणावातून जावं लागतं. बेड्स, व्हेटिलेटरच्या तुटवड्यासोबतच राज्यात अनेक ठिकाणी कोरोना रूग्णांची माहितीच नातेवाईकांना मिळत नव्हती. यामुळे अनेक ठिकाणी गोंधळ झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. नातलगांच्या तक्रारीनंतर वर्ध्यात रुग्णाच्या तब्येतीची माहिती नातलगांना मिळण्यासाठी मेडिकल बुलेटिन सुरू करण्याचे निर्देश रुग्णालयांना देण्यात आले आहेत.


वर्ध्यातील एका व्यक्तीचे नातलग कोरोना बाधित असल्याने रुग्णालयात भरती होते. त्यांच्या तब्येतीची माहिती मिळावी, याकरिता सतत संपर्क सुरू होता. पण ती माहिती मिळाली नाही, असं नातलगांनी सांगितलं. कोविड वॉर्डात रुग्णाजवळ नातलग, आप्तेष्ट नसतात. अशावेळी सर्वांनाच काळजी असते. त्यामुळे रुग्णाच्या प्रकृतीची माहिती कुटुंबियांना द्यावी, अशी मागणी केली केली.


रुग्णालयात भरती असलेल्या कोविड रुग्णांची माहिती कुटुंबाकडून विचारली जाते. पण, अनेक प्रसंगी त्यांना प्रकृतीची योग्य माहिती मिळत नसल्याचे नातलगांनी प्रशासनला सांगितलं. त्यामुळे कोविड रुग्णांच्या प्रकृतीचं आरोग्य बुलेटिन जारी करावं, अशा सूचना प्रशासनानं रुग्णालयांना दिल्या आहेत. रुग्णाच्या प्रकृतीची, उपचाराला प्रतिसाद याबाबतची माहिती किमान दोन वेळा कुटुंबियांना देण्याची सोय करण्याचे निर्देश प्रशासनानं रुग्णालयांना दिले आहेत.


राज्यात बहुतांश ठिकाणी अशीच स्थिती आहे. वर्ध्याचा हा निर्णय या प्रश्नावर उत्तर ठरू शकतो. रुग्णालयांनीही पुढाकार घेत अशी सोय करणं गरजेचं आहे. ही सुविधा सुरु झाल्यास रुग्णांच्या प्रकृतीची माहिती मिळण्यास मदत होईल आणि उद्भवू शकणाऱ्या समस्याही कमी होण्यास मदत होईल.


Nagpur | रूग्णासोबतच्या व्यक्तीस मास्क घालण्यास सांगितल्यामुळे नागपुरात डॉक्टरांना बेदम मारहाण