औरंगाबाद : वसंतराव नाईक महाविद्यालयात एमबीएच्या प्रथम सत्राचा पेपर फुटला. पेपर सुरु झाल्यानंतर अवघ्या सहा मिनिटातच पेपर परीक्षार्थींच्या व्हॉट्सअपवर आला. त्यामुळे आजचा एमबीएचा पेपर अखेर रद्द करण्यात आला. परीक्षा नियंत्रकांनी ही माहिती दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे 26 डिसेंबरपासून एमबीएच्या प्रथम सत्राच्या परीक्षा घेण्यात येत आहेत. आज 'अकौंटिंग फॉर मॅनेजर' या विषयाचा पेपर वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर सुरु होता. यावेळी देवगिरी अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन शास्त्र महाविद्यालयाचा विद्यार्थी शेख अमजद कलीम याने पेपरचा मोबाईलवर फोटो काढला आणि फ्युचर मॅनेजर या मोबाईल whatsapp ग्रुपवर पाठवला. फ्युचर मॅनेजर' या ग्रुपवर पेपरचा स्नॅप आल्यानंतर ते दोघे झाडाखाली बसून उत्तर लिहित होते.
पोलिसांनी हायटेक कॉपी करणाऱ्या 3 मुलांना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याकडून 3 मोबाईल 2 पुस्तकेही ताब्यात घेण्यात आली. प्रश्न हा आहे की मोबाईल परीक्षा केंद्रात गेलाच कसा.
हायटेक कॉपीचा प्रकार लक्षात येताच नाईक कॉलेजच्या सेंटरवर परीक्षा देणारी मुलं वर्गाबाहेर आली आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरवात केली. त्यामुळे विद्यापीठाने आजचा पेपर रद्द केला.