रायगड : माथेरानच्या पर्यटनात अधिक वाढ करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून अनेक प्रयोग केले जात आहेत. आजपासून दोन दिवसांच्या प्रायोगिक तत्वावर माथेरानच्या मिनी ट्रेनला एसी डबा जोडण्यात आला आहे. यामुळे येत्या काळात नेरळ ते माथेरानचा प्रवास हा गारेगार होणार आहे.
नव्या रुपातील गाडीला प्रायोगिक तत्वावर एसीचा एक डब्बा जोडण्यात आला आहे. यामुळे शनिवार आणि रविवारी माथेरानला येणाऱ्या पर्यटकांना एसीच्या डब्यातून प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. या वातानुकुलित डब्याचं तिकीट 415 रुपये आहे. वातानुकुलित डबा जोडण्याची पर्यटकांची गेल्या अनेक वर्षांची मागणी होती. पर्यटकांचा प्रतिसाद पाहता मिनी ट्रेनच्या शनिवार आणि रविवारी ज्यादा फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.
आज सकाळी नेरळहून माथेरानकडे मिनीट्रेन फुग्यांनी सजविण्यात आली होती. माथेरानची मिनी ट्रेन ही नेहमीच पर्यटकांची आकर्षण राहिली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मिनी ट्रेनच्या रुपात बदल करण्यात आला आणि जुन्या गाडीच्या डब्यांवर हिरव्या निसर्गाचा साज चढवण्यात आली.
माथेरानचं आकर्षण असलेले घोडे, पक्षी, लाल मातीचे चित्रण या ट्रेनवर करण्यात आले. नव्या रुपातील या गाडीला पारदर्शक मोठ्या काचा लावल्याने निसर्गाचा मनसोक्त आस्वाद घेता येणार आहे.