अकोला : गेल्या काही वर्षात सातत्यानं पराभवाच्या गर्तेत असलेल्या काँग्रेसमध्ये पाच राज्यांतील एक्झिट पोलनंतर आता उत्साहाचं वातावरण आहे. पाच राज्यांपैकी दोन महत्वाच्या राज्यात म्हणजे राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये भाजपला धूळ चारण्यात काँग्रेसला यश मिळण्याची शक्यता आहे.
एक्झिट पोलनंतर देशासह राज्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते उत्साहीत झाले आहेत. विदर्भात सुरु असलेल्या जनसंघर्ष यात्रेत हा उत्साह बघायला मिळाला. अकोल्यातील अकोटमध्ये आज झालेल्या सभेत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या भाषणात एक्झिट पोलचा उल्लेखही केला. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये सध्या उत्साहाचं वातावरण आहे.
आजच्या सभेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी भाजपवर तिरकस शब्दांत वार केले. शेतकऱ्यांवर मानसोपचाराच्या सरकारी आदेशावर त्यांनी टीका केली. आता मंत्र्यांनाच मानसोपचार तज्ज्ञांकडे पाठवण्याची वेळ आली असल्याचं ते म्हणाले. दरम्यान, राज्यातील महाआघाडीचा प्रश्न पंधरा दिवसांत मार्गी लागणार असल्याचंही अशोक चव्हाणांनी स्पष्ट केलं. या महाआघाडीत प्रकाश आंबेडकरांना सामिल करण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरू असल्याची माहितीही चव्हाणांनी दिली.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांनीही भाजपवर जोरदार टीका केली. भाजपचे मंत्री शेवटची संधी समजून हात धुवून घेत आहेत. राम शिंदेंच्या चारा प्रश्नाबाबत केलेल्या वक्तव्याचाही त्यांनी यावेळी समाचार घेतला. सरकार आणि मंत्र्यांनाच आता पाहुण्यांकडे पाठवायची वेळ आल्याचं विखे-पाटील म्हणाले.