माथेरान:  माथेरानमध्ये (Matheran)  सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) आदेशाने प्रायोगिक तत्त्वावर सुरू झालेल्या ई रिक्षावर अज्ञातांनी दगडफेक केली आहे. या दगडफेकीत रिक्षाचालक आणि पर्यटक अगदी थोडक्यात बचावले आहेत.


माथेरान हे वाहनबंदी असलेलं पर्यटनस्थळ असून येथे तब्बल 172 वर्षांनी पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने प्रायोगिक तत्त्वावर ई रिक्षा सुरू करण्यात आली. मात्र या ई रिक्षाला पहिल्या दिवसापासूनच घोडेचालकांचा मोठा विरोध होता. त्यातच शनिवारी दस्तुरी नाका ते माथेरान स्टेशन दरम्यान असलेल्या वेस्टलँड हॉटेल जवळ पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या ई रिक्षावर अज्ञातांनी दगडफेक केली. या दगडफेकीत रिक्षाचालक आणि पर्यटक अगदी थोडक्यात बचावले. ही दगडफेक माकडाने केलेली किंवा चुकून एखादा दगड उडून आला अशा पद्धतीची नसून जाणीवपूर्वक बेचकीच्या सहाय्याने कोणीतरी दगड मारल्याचं रिक्षाचालक आणि प्रवासी यांचं म्हणणं आहे. या प्रकरणी माथेरान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आता या दगडफेक करणाऱ्याचा शोध घेत आहेत.


माथेरान गिरीस्थानाचा ब्रिटिशांनी 1850 साली शोध लावला. तेव्हापासून येथील पर्यावरणाचं नुकसान होऊ नये या हेतूने माथेरानमध्ये वाहनबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांना दस्तुरी पॉईंटच्या वाहन तळावर गाड्या लावून पुढे माथेरान गिरीस्थानापर्यंतचा तीन किलोमीटरचा प्रवास हा घोडा किंवा हाताने ओढाव्या लागणाऱ्या रिक्षाने करावा लागत होता. नेरळ माथेरान दरम्यान धावणारी मिनीट्रेन सुद्धा आतापर्यंत अनियमित होती. त्यात घोडा आणि हातरिक्षाचे दरही अनेकांना परवडणारे नसल्यामुळे बहुतांशी पर्यटकांना दस्तुरी पॉईंट ते माथेरान अशी तीन किलोमीटरची पायपीट करावी लागत होती. या सगळ्याचा माथेरानच्या पर्यटनाला मोठा फटका बसत होता. मात्र बदलत्या काळानुसार माथेरान गिरीस्थानावर पर्यावरणाचं नुकसान न करता ई रिक्षाला परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात येत होती. 


सध्या माथेरान नगरपरिषदेकडून स्वतः ई रिक्षा चालवली जात असून त्यासाठी दस्तुरी पॉईंट ते माथेरान बाजारपेठ या तीन किलोमीटरच्या प्रवासासाठी 35 रुपये आकारले जात आहेत. तर विद्यार्थ्यांसाठी हा दर अवघा पाच रुपये इतका असणार आहे. या ई रिक्षा सेवेमुळे माथेरानला येणाऱ्या पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार असून त्यामुळे भविष्यात माथेरानच्या पर्यटनालाही मोठी चालना मिळू शकणार आहे. तर स्थानिक रहिवासी, वयोवृद्ध नागरिक, विद्यार्थी यांनाही या ई रिक्षा सेवेचा फायदा होणार आहे.