मुंबई: सध्याचे कामगार मंत्री हे माथाडी कामगारांच्या (Mathadi Kamgar) विरोधात आहेत, कामगार चळवळीच्या विरोधात आहेत असा घरचा आहेर माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी दिला. सध्याच्या कामगार मंत्र्यांची भूमिका ही कामगारांच्या विरोधात असून त्यावर चर्चा करणार असल्याचंही ते म्हणाले. नरेंद्र पाटील यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया देताना हे वक्तव्य केलं. 


आण्णासाहेब पाटील यांची 90 वी जयंती नवी मुंबईत 25 सप्टेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. त्या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांची उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमात 18 माथाडी कामगारांना 'माथाडी कामगार पुरस्कार' देण्यात येणार असल्याची माहिती नरेंद्र पाटील यांनी दिली आहे. आण्णासाहेब पाटील हयात असल्यापासून ज्यांनी माथाडी कामगारांसाठी काम केलं आहे त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार असल्याचं नरेंद्र पाटलांनी सांगितलं. 


Narendra Patil On Labour Law : कामगार मंत्री कामगारांच्या विरोधात 


नरेंद्र पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, सध्याचे कामगार मंत्री हे माथाडी कामगारांच्या हिताच्या विरोधात आहेत, कामगार चळवळीच्या विरोधात आहेत. मूळ कामगार कायदा हा महाराष्ट्राचा आहे, त्याला बळ देण्याची आवश्यकता असताना त्यामध्ये बदल केला जात आहे. त्यामध्ये माथाडी कामगारांची अॅडव्हायजरी बंद करण्यात येईल आणि कारखान्यातील माथाडी कामगारांसाठी कायदा लागू केला जाणार नाही अशी तरतूद आहे. तसेच कामगारांची वयोमर्यादा ठरवण्यात आली आहे. मग 60 वर्षांनंतर कामगारांना तुम्ही पेन्शन देणार का? कामगारांनी कसं जगायचं हे तुम्ही ठरवणार का? त्यामुळे कामगार मंत्र्यांची भूमिका ही कामगारांच्या विरोधात आहे. यावर कामगार मंत्र्यांशी चर्चा करून तो कायदा चांगला करणार आणि वाईट गोष्टी बाहेर काढणार. 


सरकारमध्ये असलो तरी चुकीच्या गोष्टींना विरोध करणार असल्याचं नरेंद्र पाटील यांनी सांगितलं. ते म्हणाले की, मुलगा जोपर्यंत रडत नाहीत तोपर्यंत आई दूध पाजत नाही. त्याचप्रमाणे आहे हे सगळं. म्हणून आम्ही कामगार कायद्याला विरोध केला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी बिल हे वरिष्ठ पातळीवर पुढे ढकललं. सत्तेत असलो म्हणून विरोध करायचा नाही आणि सत्तेबाहेर असलो तर विरोध करणे ही माझी सवय नाही. 


खंडणीखोर कामगार नेते हे सत्तापिपासू असून त्यांना जर पक्षातील मोठी पदं दिली तर त्याला विरोध करणार असल्याचं नरेंद्र पाटील यांनी सांगितलं. ते म्हणाले की, माथाडी कामगारांच्या नावाखाली पैसे मागणाऱ्यांवर राज्य सरकारने, पोलिसांनी कारवाई करावी. कामगारांच्या नावाखाली कंपन्यांना वेठीस धरणाऱ्यांना सत्तेत बसवलं तर कसं होणार? काही माथाडी कामगार कॉन्ट्रॅक्टर झाले आहेत, त्यांना जर मोठी पदं दिली तर त्याला विरोध करणार. 


ही बातमी वाचा: