नांदेड: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कोरोना लॅबमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला असून कुलगुरुंच्या वाहनाच्या चॉईस नंबरसाठी हजारो रुपये मोजण्यात आल्याचा आरोप विद्यापीठाचे सिनेट सदस्य आणि युवा सेनेचे कार्यकर्ते प्रा.सूरज दामरे यांनी केलेत.
कोरोना लॅबमध्ये अपहार
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात उभारण्यात आलेल्या covid-19 लॅबमध्ये मोठ्या प्रमाणात साहित्य खरेदी करण्यात आले होते. यामध्ये मोठया प्रमाणात अपहार झाला असल्याचं प्रा.सूरज दामरे यांनी सांगितलं. यासंबंधी आवश्यक असलेलं कोटेशन मागवण्यात आलं नाही आणि ई-निविदाही काढण्यात आल्या नाहीत. आरोपही त्यांनी केला. या कामात परस्पर खरेदी करुन लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला गेल्याचा आरोप विद्यापीठाच्या सिनेट सदस्याने केला आहे.
कोविडच्या लॅबच्या उभारणीत आणि साहित्य खरेदीतील घोळाची यादीच दामरे यांनी दिली आहे. लॅब उभारणी करण्यासाठी एक कोटी सात लाख 85 हजारचा निधी मंजुर झाला होता. शासकीय आदेशानुसार सदर काम हे ई-निविदा प्रसिद्ध करुन, कार्यारंभ आदेश असे कोणतेही नियम न पाळता हे काम करण्यात आले आहे असे त्यांनी सांगितलं.
यामध्ये पीपीई किट आणि मास्कचे दर वाढीव लावण्यात आले आहेत. अनेक वेळा त्याच्या दरात तफावत दिसून येत. विशेष बाब खरेदी करण्यात आलेली दुकाने मात्र ठराविकच आहेत. पीपीई किट 1000 रुपये अधिक 5 टक्के gst सह तर कधी 795 रुपयांना खरेदी केले आहेत. N-95 मास्कचा दर 230 अधिक 5 टक्के gst तर कधी 191 तर कधी 241 रुपये दराने खरेदी करण्यात आले आहेत.
दोन नवीन गाड्या आणि व्हीआयपी नंबर
विद्यापीठ कुलगुरुकडे दोन महागड्या गाड्या असताना त्यांनी विद्यापीठाच्या पैशातून दोन नवीन गाड्या घेतल्या असल्याचा धक्कादायक आरोप प्रा.सूरज दामरे यांनी केला. एवढंच नाही तर व्हीआयपी नंबर साठी चक्क 50 हजार रुपये मोजल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या आधीच्या गाड्यांच्या नंबरसाठीही अनावश्यकरित्या हजारो रुपये मोजण्यात आले आहेत असे प्रा.सूरज दामरे यांनी सांगितलं.
याच काळात विद्यापीठ परिसरात बंधाऱ्याचं बांधकाम करण्यात आलं आहे. यासाठी अंदाजित खर्च हा बारा लाख अपेक्षित होता मात्र काम 6 लाख 54 हजारात पूर्ण करण्यात आलं आहे. यासाठी कोणत्याही स्वरुपातील तांत्रिक मान्यता घेण्यात आली नाही, ई-निविदा काढण्यात आली नाही.या कामाचं एमबी रेकॉर्ड ही केलं नसल्याचा आरोप प्रा.सूरज दामरे यांनी केला.
ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी पुण्यातील एका एजन्सीला काम देण्यात आलं होतं मात्र त्यांना हे काम करता आलं नाही. शेवटी ऑफलाईन परीक्षा घ्याव्या लागल्या. त्या एजन्सीला पाठीशी कोणत्या कारणामुळं घातलं गेलं असा सवाल करत दामरे यांनी यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचं सांगितलं.
ह्या या सर्व प्रकरणाची चौकशी लावण्यात यावी अशी मागणी दामरे यांनी राज्य शासनाकडे केली आहे. या प्रकरणात कुलगुरु, कुलसचिव ,परीक्षा संचालक, कार्यकारी अभियंता आणि वित्त लेखा अधिकारी यांची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. त्यांच्या या मागणीची योग्य ती दखल घेतली नाही तर विद्यापीठासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा ही देण्यात आला आहे.
पहा व्हिडिओ: Corruption in SRTMUN | स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कोविड लॅब, गाड्यांमध्ये भ्रष्टाचार?
महत्वाच्या बातम्या: