रत्नागिरी : कोरोना विरुद्धचा लढा आता निर्णायक वळणावर आला आहे. यावर लस प्राप्त होईपर्यंत मास्कच उत्तम लस ठरणार आहे, याची जाण ठेवा आणि इतरांना जाणीव करुन द्या. कोरोनाची दुसरी लाट येवू द्यायची नाही. यासाठी MAH अर्थात मास्क, अंतर आणि हातांची स्वच्छता अशी शपथ सर्वांनी घ्यावी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी रुग्णालयातील प्लाझ्मा थेरपीसाठीच्या अफेरेसिस युनिटच्या ऑनलाईन उद्घाटन प्रसंगी केले. जिल्हा रुग्णालयात अशी व्यवस्था उपलब्ध झालेला रत्नागिरी हा राज्यातील पाहिला जिल्हा ठरला आहे.
कोकणला लाटांचा सामना कसा करायचा ते शिकवण्याची गरज नाही. पण कोरोनाबाबत दुसरी लाट न येवू देणे ही प्राथमिकता आहे. कोरोनामुक्त झालेली एक व्यक्ती एका महिन्यात दोन वेळा प्लाझ्मा दान करुन चार जणांचा जीव वाचवू शकते. त्यामुळे येणाऱ्या काळात मृत्यूदर देखील कमी होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
माझं कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेत रत्नागिरीत झालेले काम कौतुकास्पद आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की याच पध्दतीने आगामी काळात जाणीवर जागृती करुन कोरोनाचा घसरता आकडा आणखी कमी करा. युरोपप्रमाणे पुन्हा लॉकडाऊन की मास्क, सुरक्षित अंतर आणि हातांची स्वच्छता याबाबत प्रत्येकापर्यंत जागृती करा.
इतर रोगांमध्येही फायदा
प्लाझ्मा अफेसेसिस युनिट मलेरिया, डेंग्यू तसेच इतरही अनेक आजारात मदत करणार आहे. यासाठी लागणारी यंत्रे 1 ते 2 लाखात येतील ती खरेदी करुन यातून कायमस्वरुपी उपचार व्यवस्था उपलब्ध करुन द्यावी असे आरोग्यमंत्री टोपे याप्रसंगी म्हणाले. रत्नागिरीत घराघरापर्यत पोहोचून आरोग्ययंत्रणा व जिल्हा प्रशासनाने उत्तम कामगिरी केली याबद्दल त्यांनी अभिनंदन देखील यावेळी केले.