मारुती नवलेंच्या मुलाच्या लग्नात करोडोंची उधळण, कर्मचारी पगाराविना
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे | 15 Dec 2018 05:49 PM (IST)
पुण्याच्या सिंहगड संस्थेचे अध्यक्ष मारुती नवले यांच्या मुलाच्या लग्नात कोट्यवधी रुपयांची उधळण केली जात आहे. परंतु त्यांच्या संस्थेतील कर्मचाऱ्यांना गेल्या 6 महिन्यांपासून पगार दिलेला नाही.
पुणे/जयपूर : पुण्याच्या सिंहगड संस्थेचे अध्यक्ष मारुती नवले यांच्या मुलाच्या लग्नात कोट्यवधी रुपयांची उधळण केली जात आहे. परंतु त्याच वेळी त्यांच्या संस्थेतील कर्मचाऱ्यांना गेल्या 6 महिन्यांपासून पगार दिलेला नाही. सिंहगड संस्थेतील प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार थकवल्याचा मारुती नवलेंवर आरोप आहे. लग्नावरचा खर्च किती? मारुती नवले यांच्या मुलाचा विवाहसोहळा उदयपूरच्या उमेदभवनमध्ये पार पडणार आहे. तीन दिवसांसाठी हा पॅलेस बूक करण्यात आला आहे. या पॅलेससाठी दर दिवसाला 67 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या लग्नाला येणाऱ्या वऱ्हाडी मंडळींसाठी पुणे, मुंबईहून चार्टर्ड विमानांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच लग्नपत्रिकेसोबत सुका मेवा, महागडी अत्तरे आणि भेटवस्तूदेखील देण्यात आल्या आहेत. नवले यांचा मुलगा रोहित आणि त्याची होणारी पत्नी श्रुती यांचे प्री वेडिंग शूट इटलीत झाले आहे. नवलेंच्या मुलाच्या लग्नावर इतका भरमसाठ खर्च होत असताना, त्यांच्या संस्थेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मात्र मागील सहा महिन्यांचा पगार दिलेला नाही. त्यामुळे नवले यांच्यावर टीका केली जात आहे. रणवीर - दीपिका, प्रियंका - निक, ईशा अंबानी- आनंद पिरामल यांच्या बिग फॅट वेडिंगनी सध्या धुमाकूळ घातला आहे. परंतु यामध्ये आपला महाराष्ट्रही मागे नाही. मारुती नवले यांच्या मुलाचा ज्येष्ठ अभिनेते कुलभुषण खरबंदा यांच्या मुलीसोबत विवाह होणार आहे. ज्या ठिकाणी प्रियांका आणि निकने लग्नागाठ बांधली. त्याच उदयपूरच्या उमेद भवनात नवलेंच्या मुलाचा विवाहसोहळा आहे परंतु हे लग्न म्हणजे वऱ्हाडी तुपाशी आणि कर्मचारी उपाशी असाच प्रकार असल्याचे सध्या बोलले जात आहे. कारण मारुती नवले यांनी ते अध्यक्ष असलेल्या सिंहगड संस्थेत काम करणाऱ्या प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार थकवले आहेत. नवलेंच्या मुलाच्या लग्नातला झगमगाट डोळे दिपवणारा आहे. दुसऱ्या बाजुला त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यासमोर आणि घरात अंधारी आणणारा आहे.