सोलापूर : कोरोनाच्या महामारीने संपूर्ण जग त्रस्त आहे. अशातच सोलापुरातील बार्शीत उत्तर प्रदेशची एक तरूणी अडकून प़डली होती. तीन महीने ही तरूणी बार्शीतील शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांच्या अन्नछत्र मंडळात आपला उदरनिर्वाह करत होती. ही तरूणी निराधार असल्याने तिचं बार्शीतील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कन्यादान करून लग्न लावलं आहे.


मूळची उत्तर प्रदेश येथील रहिवासी असलेल्या निशा नवल भारतीला मुंबईत तीचा चुलता सोडून पळून गेला. भेदरलेल्या अवस्थेत ही तरूणी एका टेम्पोत बसली आणि हा टेम्पो थेट बार्शीत पोहोचला. बार्शीत उतरल्यानंतर घाबरलेली ही तरूणी रस्त्याने रडत फिरत होती. हे पोलिसांना कळल्यानंतर त्यांनी त्या तरूणीला भाऊसाहेब आंधळकर यांच्याशी संपर्क केला. भाऊसाहेब आंधळकर यांनी मुलीला आपल्या इंदुमती आंधळकर अन्नछत्र मंडळात काम लावून दिले. तसेच बार्शीतच तिच्या राहण्याची सोय देखील केली.


मागील तीन महिन्यांपासून भाऊसाहेब आंधळकर निशा हिचा सांभाळ करत आहेत. निशा हिने देखील लॉकडाऊनच्या काळात भाऊसाहेब आंधळकर लोकांना करत असलेल्या अन्नदानाच्या सेवेत मदत केली. मुलीप्रमाणे सांभाळ केलेल्या या तरुणीचा विवाह देखील आंधळकर यांनी लावून दिला. याप्रसंगी भाऊसाहेब आंधळकर यांनी माध्यमांशी बोलताना हे लग्न फार महत्वाचं होतं कारण या लग्नामुळे एका अनाथ मुलीचे पुनर्वसन झाले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मनोज आणि निशा या दोघांनीही आपण या लग्नामुळे आनंदी असल्याचं सांगितलं.


लहानपणीच आईवडील वारलेल्या निशाच्या भविष्याचं काय करायचं असा प्रश्न पडला असता आंधळकर यांनी निशाला लग्नाविषयी विचारले असता तिनेही होकार दिला. मग आंधळकर यांनी बार्शीतच मुलाचा शोध सुरू केला. शोध सुरू असतानाचा बार्शीत मागील तीस वर्षांपासून स्थायिक असणाऱ्या तसेच एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका उत्तर प्रदेशच्या तरुणाला निशाविषयी विचारले असता त्यानेही होकार दिला.आणि मूळचा उत्तर प्रदेशचा असलेल्या मनोज ठाकूर या तरूणाशी निशाचा विवाह लावून दिला.


या लग्नात बार्शीतील बरीच मंडळी उपस्थित होती. मुंबईतून बार्शीत दाखल झाल्यानंतर ज्या पोलिसांनी निशा हिला पाहिले होते ते सहायक पोलीस निरीक्षक बबन येडगे हे देखील यावेळी उपस्थित होते. ही तरुणी बार्शीत आली तेव्हा ती रस्त्याने रडत फिरत होती. अचानक नवीन ठिकाणी आल्याने ती पूर्णपणे भेदरून गेलेली होती. मात्र अशा परिस्थितीतही बार्शी शहरातील काही सुज्ञ नागरिकांनी या तरुणीला पाहिले आणि तिची विचारपूस केली असता ही तरुणी उत्तर प्रदेशची आहे असं कळलं. तीन महिने सांभाळ करून आज भाऊसाहेब आंधळकर यांनी तिचा विवाह लावून दिला आहे समाजातील प्रत्येकाने आदर्श घ्यावा असे हे कृत्य असल्याचं सहायक पोलिस निरीक्षक बबन येडगे यांनी सांगितले. कोरोनामुळे सुरू झालेल्या लॉकडाऊनमध्ये माणुसकीची अनेक उदाहरणे जगभर पाहायला मिळत आहेत. त्यापैकीच हे एक उदाहरण म्हणावं लागेल.