Marathwada Rains : मराठवाड्यासह (Marathwada) राज्यातील अनेक ठिकाणी पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मध्यरात्रीपासून नांदेड, बीड, हिंगोली, लातूर, धाराशिव, परभणी, गोंदिया, सोलापूरसह अनेक जिल्ह्यांत पावसाने थैमान घातले असून, नदी-नाल्यांचा प्रवाह प्रचंड वाढला आहे. अनेक धरणांचे दरवाजे उघडण्यात आले असून, काही ठिकाणी सखल भाग जलमय झाले आहेत. शहरांमध्ये वाहतुकीला अडथळा, घरात पाणी, विजेचा लपंडाव सुरू असतानाच, ग्रामीण भागात शेतकऱ्यांपुढे नवे संकट उभं ठाकलं आहे. कापणीच्या टप्प्यात असलेली सोयाबीन आणि धानपिके या पावसामुळे सडण्याच्या मार्गावर आहेत. धाराशिव, बीड आणि गोंदियात पिकांचे मोठे नुकसान झाले असून, लातूर आणि माजलगाव धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. नांदेडसह अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा, कॉलेजांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

Continues below advertisement

नांदेड जिल्ह्यात ढगफुटीसदृश पावसाचा कहर (Nanded Rains)

गेल्या चार दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा नांदेडमध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. शहरात आणि परिसरात विजांच्या कडकडाटासह सुरू असलेल्या या पावसामुळे रस्ते जलमय झाले आहेत. गोदावरी आणि आसना नद्यांमध्ये काल काहीशी ओसरलेली पूरस्थिती पुन्हा गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान खात्याने नांदेडसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून, जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी खबरदारीचा उपाय म्हणून शाळा, महाविद्यालये आणि खाजगी क्लासेसना आज सुट्टी जाहीर केली आहे. शहरातील सखल भागांमध्ये घरात पाणी शिरण्याचे प्रकार सुरू झाले असून, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हिंगोलीत ओढ्यांना पूर, शेतात गुडघाभर पाणी (Hingoli Rains)

हिंगोली जिल्ह्यातही पावसाने थैमान घातले आहे. दांडेगाव शिवारात मुसळधार पावसामुळे गावाजवळून वाहणाऱ्या ओढ्याला पूर आला आहे. पुराचे पाणी आजूबाजूच्या शेतांमध्ये शिरल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गावातील अर्ध्या भागात पुराचे पाणी शिरल्याने काही कुटुंबांनी सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांना सध्या आपल्या उभ्या पिकांबाबत चिंता वाटू लागली असून, नुकसानभरपाईसाठी शासनाकडून तातडीच्या मदतीची मागणी केली जात आहे.

Continues below advertisement

लातूर जिल्ह्यात रेणा प्रकल्पाचे दरवाजे उघडले (Latur Rains) 

लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील भंडारवाडी येथील रेणा मध्यम प्रकल्पाचे चार दरवाजे शुक्रवारी रात्री उघडण्यात आले. दरवाजे 20 सेंटीमीटरने उघडण्यात आले असून 2,529 क्युसेक्स इतका विसर्ग रेणा नदी पात्रात सुरू आहे. दरम्यान, सतत सुरू असलेल्या पावसामुळे रेणा नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. रात्रीपासून सुरू असलेला कोसळधार पाऊस आज सकाळपर्यंतही सुरूच आहे.

बीड जिल्ह्यात नद्यांना पूर, शेती अडचणीत (Beed Rains)

बीड जिल्ह्यातील गोदावरी,सिंदफणा, बिंदुसरा, मांजरा या नद्या रात्रीच्या दमदार पावसानंतर पुन्हा प्रवाहित झाल्या आहेत. तीन दिवस विश्रांती घेतल्यानंतर पावसाची पुन्हा दमदार पुनरागमन झाली आहे. त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शेतकरी सावरत असतानाच पुन्हा नव्याने संकट ओढवल्याने चिंता वाढली आहे.

मांजरा आणि माजलगाव धरणातून विसर्ग (Discharge from Manjara and Majalgaon dams)

माजलगाव धरणाचे 11 दरवाजे उघडून 42,000 क्युसेक्स आणि मांजरा धरणाचे 6 दरवाजे उघडून 27,166 क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सिंदफणा व मांजरा नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

परभणी जिल्ह्यात पावसाचे पुन्हा थैमान (Parbhani Rains) 

परभणी जिल्ह्यात पावसाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. काल रात्रीपासून जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस बरसत आहे.  यामुळे पुन्हा एकदा नदी नाल्यांना पाणी आले आणि उरल्यासुरल्या पिकांचीही माती हा पाऊस करणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रचंड आभाळ आणि पाऊस यामुळे अद्यापही शहरात दृश्यमानता कमी आहे. शहरातील विविध रस्त्यांवर पाणी साचायला सुरुवात झाली आहे. 

धाराशिवमध्ये जोरदार पाऊस; शाळांना सुट्टी (Dharashiv Rains) 

धाराशिव जिल्ह्यात रात्रभर झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील बसस्थानकासह अनेक सखल भागांत पाणी साचलं आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, प्रेरणा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असून, त्यामुळे आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचा सर्वात मोठा फटका सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. अनेक भागांमध्ये सोयाबीन काढणीला आलेलं असून, काही ठिकाणी महापुराच्या पाण्यात अडकलेली पीकं अद्याप सुकलेली नाहीत. आता नव्या पावसामुळे ही पिकं सडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

गोंदिया जिल्ह्यात पिकांचे नुकसान (Gondia Rains)

रात्रीपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील धानपिक जमीनदोस्त झाले आहे. कापणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे.

सोलापुरात पूरस्थिती कायम (Solapur Rains)

सोलापूर जिल्ह्यात पावसाची पुनरागमन होताच परिस्थिती पुन्हा गंभीर होत आहे. सीना नदीला पूर आलेला असून, वडकबाळ गावात साळींदर प्राणी रस्त्यावर आला, तर सर्पदंशाने एका नागरिकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. गावात पाणी साचल्याने साप घरात घुसण्याचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांना विशेष सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई, ठाणे आणि इतर भागांमध्ये पावसाचा जोर (Mumbai Rains)

मुंबईत शिवाजी पार्क परिसरात गेल्या तासाभरापासून पावसाचा जोर कायम आहे. ठाणे शहरातही पावसाला सुरुवात झाली असून, हवामान खात्याने पुढील काही तासांत अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली असून, वंदना डेपो परिसरात जलमय परिस्थिती निर्माण झाली आहे.

सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट (Sindhudurg Orange alert)

सिंधुदुर्ग जिल्ह्यात बहुतांश भागात संततधार पाऊस कोसळत आहे. आज आणि उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. तर मच्छीमारांना खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे.

आणखी वाचा 

Heavy Rain Alert: मुंबई, पुण्यासह ठाण्यात दोन दिवस अतिमुसळधारेचा इशारा; आठवडाभरात मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात दुप्पट पाऊस, हवामान विभागाच्या अलर्टने चिंता वाढली