Marathwada Flood: गेल्या आठवड्याभर पावसाने मराठवाड्याला झोडपल्यानंतर धाराशिव, बीड ,लातूर, हिंगोली, परभणी जिल्ह्यात रात्रभर झालेल्या पावसाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे . लातूर जिल्ह्यातील जळकोटमधील वेळ सांगवी गावाला पाण्याचा वेढा असून बचाव पथकं बोलवण्यात आली आहेत . परभणीत काल रात्रीपासून बरसत असलेल्या पावसाचा फटका शेत पिकांसह घरांनाही बसलाय . (Marathwada Flood) शहरातील गाडगेबाबा नगरमध्ये नाल्याचे पाणी थेट घरात शिरले आहे .अनेक घरांमध्ये गुडघाभर पाणी पाहायला मिळत आहे .अनेकांच्या संसाराची वाताहात झाली आहे . हिंगोलीत कयाधू नदीला पूर आला आहे . या पुरामुळे नदीकाठची शेकडो एकर जमीन पूर्णतः पाण्याखाली गेली आहे .गावात पाणी शिरल्याने दाणादाण उडाली आहे .
लातूरमध्ये बचाव पथकांना पाचारण
लातूरचा जळकोट तालुक्यातील बेळसावंगी गावाला पाण्याचा वेढा बसलाय .संपूर्ण गाव दोन्ही बाजूंनी पुराच्या पाण्याने बेडले गेले आहे .तिरू नदीच्या प्रकल्पामधूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे . जर आणखी पाऊस पडला तर परिस्थिती बिकट होऊ शकते .या गावात साधारण 700 ते 800 लोकसंख्या असून सर्वांचे तातडीने स्थलांतर करणे आवश्यक बनले आहे .सध्या स्थानिक अग्निशामक विभागाच्या दोन टीम घटनास्थळी दाखल झाल्यात . उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांनी घटनास्थळी भेट दिली असून NDRF ,भारतीय लष्कराच्या पथकांना प्राचारण करण्यात यावे अशी मागणी केली आहे .
पावसामुळे मोठी पडझड
सलग आठवडाभर जोरदार पावसाने गाठल्यानंतर काल रात्रीपासून धाराशिव जिल्ह्यात सर्वत्र पावसाने धुमाकूळ घातला .धाराशिवचा लासोना गावच्या जिल्हा परिषद शाळेच्या वर्ग खोलीची भिंत ढासळली असून शाळेला सुट्टी असल्याने मोठा अनर्थ टळला आहे .
मध्यरात्रीपासून बीड जिल्ह्याला पावसाने पुन्हा झोडपले आहे .अनेक सखल भागात पाणी शिरल्या असून बीडचे ग्रामीण पोलीस ठाणे देखील पाण्यात आहे .पोलीस ठाण्यात पाणी शिरल्यामुळे सकाळपासून कामकाज बंद आहे .माजलगावच्या बडेवाडी जिल्हा परिषद शाळेतही पावसाचे पाणी साठल्याने शाळेला तळ्याचे स्वरूप आले आहे .शाळेतील साहित्याचे देखील मोठे नुकसान झाले असून शाळांना अघोषित सुट्टी मिळाली आहे . हिंगोलीत कयाधू नदीच्या पुराचे पाणी जिनिंग कंपनीत शिरून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे .सर्व मशीन अर्ध्याहून अधिक पाण्यात आहेत .अगदी काहीच दिवसांमध्ये ही कंपनी शासनाच्या वतीने कापसाची खरेदी करणार होती .परंतु त्याआधीच पुराने शेतकऱ्यांचा कापूस उध्वस्त केला आहे .
जालना जिल्ह्याला पुढील चार तास रेड अलर्ट
जालना जिल्ह्यात पुढील चार तास रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे .पुढील काही तासात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे .अनावश्यक कामासाठी बाहेर पडू नका .जिल्ह्यातील नागरिकांनी काळजी घेण्याचा आवाहन जिल्हा प्रशासन करत आहे .