Continues below advertisement

BLOG : “9 दिवस 9 महान स्त्रियांच्या प्रेरणागाथा” या मालिकेत आज आपण भेटतो आहोत अशा स्त्रीला, जिने गणिताला आपल्या बुद्धीचं खेळणं बनवलं. त्या म्हणजेच शकुंतला देवी जगप्रसिद्ध ह्यूमन कॉम्प्युटर.

बालपणातील अद्भुत गुण

शकुंतला देवी यांचा जन्म 1929 बंगळुरू येथे झाला. वडील सर्कशीत काम करायचे. फक्त तीन वर्षांच्या वयातच शकुंतलाबाईंनी आकडेमोडीतील अद्भुत कौशल्य दाखवलं. त्या कोणतीही गुंतागुंतीची गणितं क्षणात सोडवायच्या. त्यांच्या या विलक्षण क्षमतेमुळे त्यांना “ह्यूमन कॉम्प्युटर” ही उपाधी मिळाली. लंडन, न्यूयॉर्क, टोकियो अशा शहरांमध्ये त्यांनी आपली कसबं सादर केली.

Continues below advertisement

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा ऐतिहासिक क्षण

1982 मध्ये लंडनमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात प्रेक्षकांनी श्वास रोखून धरला होता. मंचावर मोठ्या स्क्रीनवर दोन प्रचंड संख्या झळकत होत्याप्रत्येकी 13 अंकांच्या. अगदी आधुनिक संगणकालाही हे गुणाकार सोडवायला वेळ लागला असता. पण शकुंतला देवी फक्त डोळे मिटून काही सेकंद विचारात पडल्या… आणि 28 सेकंदांत उत्तर सांगितलं. जेव्हा संगणकावर तो परिणाम तपासण्यात आला आणि ते उत्तर अचूक निघालं, तेव्हा सभागृहात जोरदार टाळ्यांचा गडगडाट झाला. त्या क्षणी त्यांचं नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं गेलं.

शिक्षण नसलं तरी प्रतिभा अनोखी

शकुंतलादेवींकडे औपचारिक उच्च शिक्षण नव्हतं, पण त्यांच्या बुद्धिमत्तेने जग दंग झालं. गणिताव्यतिरिक्त त्यांनी समाजातील संवेदनशील विषयांवरही लेखन केलं. The World of Homosexuals हे त्यांचं पुस्तक त्या काळात क्रांतिकारक ठरलं.

प्रेरणा

शकुंतला देवींचं आयुष्य सांगतं की प्रतिभा ही कुठल्याही चौकटीत अडकलेली नसते. गरिबी, शिक्षणाचं बंधन, समाजाची चौकट यापैकी कुठलंच त्यांच्या वाटेत अडथळा ठरलं नाही. शकुंतला देवी या केवळ गणिती प्रतिभा नव्हत्या, तर आत्मविश्वास आणि चिकाटीचं प्रतीक होत्या. त्यांनी दाखवून दिलं की, जर तुमच्यात कौशल्य असेल, तर जग तुमचं मंच बनतं.

हा संबंधित ब्लॉग वाचा: