Marathwada Rain Update: मराठवाड्यातील पूर परिस्थिती ओसरण्यास सुरुवात होताच पुन्हा एकदा बीड, धाराशिव, परभणी ,नांदेडसह लातूरमध्ये गेल्या 24 तासात पावसाने हाहाकार माजवला आहे. परभणीच्या पूर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांची पिके कमरे एवढ्या पाण्यापर्यंत आली आहेत. सोयाबीन कापूस चिंब भिजले असून शेतकरी कर्जमाफी आणि सरसकट मदतीची मागणी करत आहेत. अनेक सखल भागात पाणी शिरल्याने  जनजीवन विस्कळीत झाले असून पुरामुळे आधीच भिजलेली पिके चारा मृत जनावरे यांच्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.  (Flood)

Continues below advertisement

रात्रभर झालेल्या दमदार पावसामुळे बीडमधील जिल्हा परिषद शाळेला तळ्याचे स्वरूप आले आहे. पुणे परिसरात झालेल्या पावसाने उजनी धरणातून 80 हजार क्युसेक विसर्ग भीमा नदीत होतोय. त्यामुळे चंद्रभागा दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे अजूनही अनेक गावांना पुराचा धोका कायम आहे. प्रशासनाकडून या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कुठे काय परिस्थिती आहे ?पाहूया सविस्तर....

बीड धाराशिवमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस 

गेल्या आठवड्यापासून होणाऱ्या पावसामुळे आधीच पूर परिस्थिती निर्माण झालेल्या धाराशिव आणि बीड जिल्ह्यात काल रात्रीपासून पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली. नदी नाल्यांना पूर आल्याने अनेक गावांचा अंतर्गत संपर्क तुटला होता. धाराशिव जिल्ह्यातील काजळा गावातील नदीच्या पुलावरून पाणी वाहत असून रस्ता वाहतुकीस पूर्ण बंद आहे. कळंब तालुक्यातील गोविंदपुर खामसवाडी रस्ता बंद झालाय. बेंबळी बोरखेडा तसेच मोहा खामसवाडी रस्ता ही बंद करण्यात आला आहे. या रस्त्यांवरून शेतकरी बांधवांना प्रवास न करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

Continues below advertisement

बीड मधील पावसाचा जोर पुन्हा वाढला असून बहुतांश शाळांना अघोषित सुट्टी देण्यात आली आहे. जिल्हाभरात झालेल्या रात्रीच्या दमदार पावसाचा फटका शाळांनाही बसताना दिसून येतोय. बीडच्या माजलगाव येथील बडेवाडी जिल्हा परिषद शाळेत पावसाचे पाणी साठल्याने शाळेला तळ्याचे स्वरूप आले होते. रात्रभर पडलेल्या पावसामुळे शाळेत पाणी जमा झाले असून साहित्याचे देखील नुकसान झाले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास नागरिकांच्या अडचणीत आणखी भर पडणार असल्याचे चित्र आहे. 

पिके कमरेएवढ्या पाण्याखाली , परभणीत बळीराजा संकटात 

परभणी जिल्ह्यात काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा ओढे नाल्यांना पाणी आले आहे. पूर्णा तालुक्यातील चुडावा या गावाच्या परिसरातून जाणाऱ्या ओढ्यांना पूर आलाय. या पुराचे पाणी शेतीत शिरले असून आता शेतकऱ्यांची पिके कमरे एवढ्या पाण्यात तरंगताना दिसतात. सोयाबीन कापूस पाण्यात गेली आहेत. शेतकरी हतबल झालाय. पाण्याखालील पिकांची परिस्थिती पाहून शेतकऱ्यांनी सरकारकडे कर्जमाफी आणि सरसकट मदत देण्याची मागणी केली आहे.  सरकारने शेतकऱ्यांना मोठ्या संकटातून उभारावे अन्यथा नेपाळ सारखी परिस्थिती उद्भवेल असा इशाराही उद्विग्न झालेल्या शेतकऱ्यांनी दिलाय. 

पुन्हा माढा पुराचा धोका 

भोगावती खासापुरी आणि कोळेगाव धरणातून जवळपास 75 हजार क्युसिक विसर्गने पाणी सीना नदीत येण्यास सुरुवात झाली आहे. माढा परिसरात काल रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. परंडा अहिल्यानगर भागात पाऊस झाल्यास पुन्हा एकदा महापुराचा धोका वाढणार आहे.  पाऊस उघडेपर्यंत पूरग्रस्त बाधित लोकांना विस्थापित कॅम्प मध्ये थांबण्याचे आवाहन आमदार अभिजीत पाटील यांनी केले आहे. माढ्यात आत्तापर्यंत 74 हजार हेक्टर वरील पिके पाण्याखाली गेली आहेत. 750 घरांची पडझड झाली असून दीडशे जनावरांचा मृत्यू झालाय. 3600 कुटुंबांना पुराचा फटका बसला आहे. 13000 पूरग्रस्तांना विस्थापित कॅम्प मध्ये ठेवण्यात आला आहे. तर 9200 जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आला आहे.

रस्ते-महामार्ग बंद, नद्यांना पूर

लातूर  जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस झाला असून मांजरा, तेरणा, रेणा, तावरजा नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. चाकूर, रेनापूर, अहमदपूर, निलंगा तालुक्यांना फटका बसला आहे. निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी भागात 8 तासांत 63 मिमी पाऊस झाला. तेरणा प्रकल्पातून विसर्ग सुरू असून नदीला पूर आला आहे.

वांजरखेडा, ऊसतुरी, हालसी, तुगाव, लिंबाळा, मानेजवळगा, बडूर, बोरसुरी गावांजवळील पुलांवरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद. लातूर–बिदर–हैदराबाद महामार्ग (752) तसेच महाराष्ट्र–कर्नाटक सीमेवरील विंचूर पुल बंद. औसा-भादा मार्गावरील हळदुर्ग पुल, थोडगा पुल, थोडगा–मोघा, किल्लारी–मदनसुरी, उदगीर तालुक्यातील नेत्र रस्ता बंद.