औरंगाबाद : राज्यासह जगभरात मराठी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठातही मराठी दिन साजरा झाला. खंडपीठातील एका न्यायालयात संपूर्ण युक्तीवाद मराठीतून करण्याचे आदेश न्यायमूर्ती संभाजी शिंदे आणि न्यायमूर्ती एस. एम. गव्हाणे यांनी दिले.

न्यायालयातील संपूर्ण कामकाज मराठीतून करण्यात आलं. विशेष म्हणजे, उच्च न्यायालयाची कामकाजाची भाषा इंग्रजी असावी, असं घटनेच्या 348 कलमात नमूद केलेलं असतानाही, मराठी दिनाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने हे आदेश दिले.

मुख्य सरकारी वकील अमरजित सिंह गिरासे यांनी न्यायमूर्तींचे अभिनंदन केलं. सगळ्या विधिज्ञांनी मराठीतून युक्तीवाद करून मराठी दिन साजरा केला.

मराठी दिनाच्या निमित्ताने जगभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. कोर्टही याला अपवाद नव्हतं, हायकोर्टाच्या खंडपीठातही कामकाज मराठीतून करत मराठी दिन साजरा करण्यात आला.