मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेला न्यायालयाने आज कोणताही दिलासा दिला नाही. केतकीच्या जामीन अर्जावर सुनावणी अपूर्ण असून तपास अधिकारी आणि वकिलांच्या अभिप्रायासाठी निर्णय राखून ठेवण्यात आला आहे. तर दुसरीकडे जेल प्रशासनाची वेळ निघून गेल्याने केतकीची आजची रात्र ठाणे मध्यवर्ती कारागृहात जाणार असल्याची माहिती आहे. 


केतकी चितळेला या आधी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यावर केतकीने जामीन मिळावा यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली. या अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने या प्रकरणाचे तपास अधिकारी आणि वकील यांच्या अभिप्रायासाठी निर्णय राखीव ठेवला. या पुढील सुनावणी तपास अधिकारी आणि वकिलांच्या अभिप्रायानंतर घेण्यात येणार आहे. 


तर दुसरीकडे जेल प्रशासनाची वेळ निघून गेल्याने केतकीची आजची रात्र ठाणे मध्यवर्ती कारागृहात जाणार आहे. उद्या सकाळी गोरेगाव पोलीस केतकीचा ताबा घेणार असल्याची माहिती आहे. 


केतकीच्या वकिलांचा युक्तीवाद
केतकी चितळेचे वकील आज या प्रकरणी युक्तीवाद करताना म्हणाले की, "केतकीवर मानहानीचा दाखल केलेला गुन्हा चुकीचा आहे, ज्या व्यक्तीचे नाव पोस्टमध्ये आहे त्याच व्यक्तीने तो दाखल करणे आवश्यक आहे.महत्त्वाचे म्हणजे केतकी हिचा देखील विनयभंग करण्यात आला आहे, तिला मारहाण करण्यात आली आहे. त्यावर गुन्हा अजूनही दाखल झालेला नाही, तो लवकरात लवकर दाखल करावा. ज्या गुन्ह्यात तीन वर्षापेक्षा कमी शिक्षा आहे, त्यामध्ये पोलिस कस्टडीची आवश्यकता नसते, तरीदेखील केतकी हिला पोलिस कस्टडी देण्यात आली, ही झुंडशाही आहे."
 
दरम्यान, केतकी चितळेचा ताबा गोरेगाव पोलिसांना देण्यात आला आहे, दोन दिवसांनी तिच्या जामीन अर्जावर सुनावणी होईल.


शरद पवारांवरील आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढल्या आहेत. ठाणे न्यायालयाने केतकीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मुंबई पोलीस आता केतकीचा ताबा घेण्याची शक्यता आहे. शरद पवारांचं निवासस्थान सिल्व्हर ओकवरील हल्ल्यानंतर विविध गुन्ह्यांप्रकरणी गुणरत्न सदावर्तेंवर महाराष्ट्रवारी करण्याची वेळ आली. आता तीच परिस्थिती केतकी चितळेवर ओढवण्याची शक्यता आहे. पवारांवरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणानंतर अभिनेत्री केतकी चितळेलाही विविध ठिकाणी दाखल गुन्ह्यांप्रकरणी राज्याचा दौरा करावा लागण्याची शक्यता आहे. केतकी चितळेविरोधात राज्यात जवळपास 15 ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत.