मुंबई : सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज राज्यभर चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आलं आहे. मराठा समाजाला आरक्षण, अॅट्रॉसिटी कायद्यात बदल अशा प्रमुख मागण्या मराठा क्रांती मोर्चाच्या आहेत. मुंबईतल्या प्रवेशद्वारांवर चक्काजाम करण्यात येणार आहे.

सिंधुदुर्गातही आंदोनाला हिंसक वळण

सिंधुदुर्गात आयोजित चक्काजाम आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. काही भागात रस्त्यावर टायर जाळून रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. तर मुंबई-गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडं तोडून वाहतूक रोखण्यात आली. सिंधुदुर्गात आज एकूण25 ठिकाणी चक्काजाम करण्यात आला. दरम्यान या आंदोलनामुळे अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावर वाहनांच्या रांगा

मराठा संघटनांच्या चक्काजाममुळे मुंबई आग्रा महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. नाशिकच्या  सिन्नर फाटा आणि जत्रा हॉटेल चौकातही मराठा संघटनांनी चक्काजाम आंदोलन सुरु आहे. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.

LIVE: दादर पूर्वमधील चित्रा टॉकिज परिसरात मराठा समाजाच्या चक्काजामला सुरुवात, लालबाग ते दादर वाहनांच्या मोठ्या रांगा


LIVE: अहमदनगरमध्ये चैदाही तालुक्यात मराठा समाजाचं चक्काजाम, राज्य मार्ग आणि राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत, सर्वत्र कडेकोट पोलिस बंदोबस्त

LIVE : मुंबईतील दादर फ्लायओव्हरवर गटारचे झाकन टाकून कार्यकर्त्यांनी वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला. सिमेंटचं झाकण टाकून कार्यकर्त्यांनी पळ काढला

LIVE : पंढरपूर-सातारा रोड बंद, सकाळी 9 वाजल्यापासून चक्काजामला सुरुवात, रस्त्यावर वाहनेच नसून पोलिसांचा मोठा फौजफाटा

LIVE : डोंबिवली, ठाणे, मुलुंड, मुंबई-पुणे महामार्गावर मराठा समाजाचा चक्काजाम, तर कामोठ्यातील कळंबोली इथे आंदोलन सुरु

LIVE : मराठा समाजातर्फे चक्काजामला सुरुवात, डोंबिवलीत मराठा समाजाच्यावतीने चार रस्ते जाम केल्याने वाहतुकीवर परिणाम

--------------------

मुंबई : सकल मराठा समाजाच्या वतीने आज मुंबईसह राज्यभरात चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. मराठा समाजाला आरक्षणासह अन्य मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी चक्काजामचं आयोजन करण्यात आलं आहे.

29 जानेवारी रोजी मराठा समाजाच्या चक्काजाम आंदोलनाची पूर्वतयारी बैठक मुंबईतील दादरमधील शिवाजी मंदिरात पाड पडली होती. चक्काजाम आंदोलन कसं यशस्वी करता येईल, याबाबतची रणनीती बैठकीत आखण्यात आली.

मुंबईतल्या प्रवेशद्वारांवर चक्काजाम करण्यात येणार आहे. तसंच दादरमधील चित्रा सिनेमागृह, वरळी नाका, चेंबूर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा याठिकाणी चक्काजाम केला जाणार आहे. तसंच मुंबई-अहमदाबाद महामार्गांसह इतर महामार्गावर चक्काजाम करण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आला आहे. यासह जिल्ह्यांमध्ये स्थानिक पातळीवरचे कार्यकर्ते चक्काजाम आंदोलन करतील, असंही आयोजकांकडून सांगण्यात आलं आहे. या चक्काजाम आंदोलनात मराठा समाजाचे लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे.

दरम्यान 6 मार्चला मुंबईत मराठा समाजाचा मूकमोर्चा आयोजित करण्यात आला आहे. मराठा आरक्षण, अॅट्रॉसिटी कायद्यात बदल, कोपर्डी बलात्कारातील आरोपींना फाशी या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यात येणार आहे.