सोलापूर : मराठा आरक्षणावरुन (Maratha Reservation) भाजप खासदार संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. काल सोलापुरात संभाजीराजेंची जनसंवाद यात्रा होती. त्यावेळी संभाजीराजेंना मॅनेज केलं की विषय संपला असं म्हणणाऱ्यांचा त्यांनी समाचार घेतला. तर, महाधिवक्ता कुंभकोणी यांनाही त्यांनी सुनावलंय. छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, आमच्या  इतक्या सोप्या मागण्या आहेत, ज्या पूर्ण केल्या जात नाहीयेत मग आम्ही बांगड्या घालून बसलोय काय? संभाजीराजेंना मॅनेज केलं की विषय संपला असं काही जणांना वाटत असेल पण माझा जन्म छत्रपती घराण्यात झालाय, मॅनेज शब्द आमच्या जवळपास ही नाही, असंही संभाजीराजे म्हणाले. 


खासदार संभाजीराजे म्हणाले की, आम्ही मूक आंदोलन केलं, शांतपणे चर्चा केली पण तुम्हाला काही फरक पडत नाही, आता संपूर्ण महाराष्ट्र आम्ही पिंजून काढणार आहोत.  यापुढे आम्ही मुख्यमंत्र्यांना देखील आता भेटणार नाही, आमचे समन्वयकही भेटणार नाहीत.


महाधिवक्ता कुंभकोणी यांच्यावर देखील टीका


सोलापुरात झालेल्या जनसंवाद यात्रेत संभाजीराजे छत्रपती यांची महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी (ashutosh kumbhakoni) यांच्यावर देखील टीका केली. अॅटोर्नी जनरल कुंभकोनी प्रचंड गोड बोलत होते, मागील दोन महिन्यांपासून पट्ट्या फिरकला सुद्धा नाही, आणि फोन देखील करत नाही. कदाचित अॅटोर्नी जनरल आशुतोष कुंभकोणी यांनी अजून आमचा हिसका पहिला नाही, असं संभाजीराजे म्हणाले. 


रायगडमध्ये बोलताना त्यांनी म्हटलं होतं की, जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. राज्य आणि केंद्राची जबाबदारी समजावून सांगण्यात येणार आहे. तसेच, कोर्टात दाखल असलेल्या रिटपिटीशनचा निकाल लागेपर्यंत समिती स्थापन करून सामाजिक मागास असलेल्या मराठा समाजाचे सर्वेक्षण करणे आवश्यक आहे. त्यांनी कोर्टातले विषय सोडून राज्य सरकारने मराठा समाजाच्या इतर प्रश्नांचा विचार करणे गरजेचे असून त्यासाठी विलंब करू नये अशी मागणी करण्यात आली. त्याचबरोबर, मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर अनेक आश्वासने देण्यात आली असून यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची गरज असून महाविकास आघाडीने बैठक घेऊन आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. अन्यथा, या सरकारला जागे करण्यासाठी आता मराठा समाजाने पुणे ते मुंबई लॉंगमार्च काढण्यात येणार असल्याचा इशारा संभाजीराजे भोसले यांनी दिला आहे.