भाजपात मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरु, संजय राऊतांचा दावा
एबीपी माझा वेब टीम | 25 Jul 2018 02:22 PM (IST)
सध्या राज्यात परिस्थिती चिंताजनक आहे. मात्र या परिस्थितीला तोंड देण्यात राज्य सरकारला पूर्णपणे अपयश आलंय, अशी टीकाही त्यांनी केली.
मुंबई : भाजपमध्ये मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरु झाली असल्याचा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. सध्या राज्यात परिस्थिती चिंताजनक आहे. मात्र या परिस्थितीला तोंड देण्यात राज्य सरकारला पूर्णपणे अपयश आलंय, अशी टीकाही त्यांनी केली. राज्यातील नेतृत्व बदलाचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाहांना घ्यायचा आहे. पण मोदी सध्या परदेशात असताना राज्यातली परिस्थिती चिंताजनक झाली आहे. राजकीय पडद्यावरुन सरकार गायब होणं अत्यंत दुर्दैवी आहे. सरकारने बघ्याची आणि पळपुटी भूमिका घेऊ नये, असंही संजय राऊत म्हणाले. मराठा आरक्षण मागणीसाठीच्या आंदोलनादरम्यान औरंगाबादमध्ये आंदोलक काकासाहेब शिंदे या तरुणाचा गोदावरी नदीत पडून मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधासाठी मराठा क्रांती मोर्चाने काल 24 जुलैला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली होती. त्यानंतर आज म्हणजे 25 जुलैला मुंबई बंदची हाक देण्यात आली आहे. राज्यभरात सुरु असलेलं हे आंदोलन काही ठिकाणी शांततेत सुरु आहे, तर काही ठिकाणी याला हिंसक वळण लागलं आहे. मराठा आरक्षणासाठी बीड जिल्ह्यातील परळीतही 18 जुलैपासून मराठा मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आलं, जे अद्याप सुरुच आहे.