Maratha Reservation Protest LIVE: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण भागातील इंटरनेट बंद करण्याचे गृह विभागाचे आदेश
Maratha Reservation Protest LIVE Updates: मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाचा आजचा आठवा दिवस असून आहे, तर आरक्षणासाठी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.
Pune Maratha Protest: पुण्यातील महात्मा फुले मंडई आज मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला पाठिंबा देण्यासाठी बंद ठेवण्यात आलेली आहे. तर मोर्चा काढत मामलेदार कचेरी इथे जाऊन निवेदन देण्यात येणार आहे. मराठा आरक्षण मिळाले तर आमच्या पोरा बाळांच्या शिक्षणाचा, नोकरीचा प्रश्न सुटेल अशी भावना व्यावसायिकांकडून व्यक्त करण्यात आली आहे. मात्र आता या आंदोलनाचा फटका हा सर्व सामान्य लोकांना बसताना दिसतोय कारण महात्मा फुले मंडई ही गजबजलेली असते मात्र आज ती बंद ठेवण्यात आली आहे.
Pawai Maratha Protest: मुंबईच्या पवई परिसरातील सकल मराठा समाजाने आज पवई प्लाझा जोगेश्वरी लिंक रोड परिसरात ठिय्या आंदोलन केलं. यावेळी सकल मराठा समाजाकडून जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देत जर जरांगे पाटलांचा काही बरं वाईट झालं तर मराठा समाज हा आक्रमक होऊन रस्त्यावर उतरेल अशी भूमिका मांडण्यात आली तसेच पवईतील जनप्रतिनिधींना कुठलेही राजकीय कार्यक्रम जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत घेऊ नका असं आवाहन देखील पवई मराठा सकल समाजाकडून करण्यात आलं यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता
Maratha Reservation Protest : आज सायंकाळी 5 वाजेपासून धाराशिव जिल्ह्यातील संचारबंदी शिथिल करण्यात आलेली आहे. तथापि जमावबंदी व शस्त्रबंदी लागू असणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
Mumbai Maratha Reservation Protest: विधानभवनाच्या पायऱ्यांवर ठाकरे आणि शरद पवार गटाच्या वतीनं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात राष्ट्रवादी (शरद पवार गट) खासदार सुप्रीया सुळे यादेखील उपस्थित असून आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.
Maratha Reservation Protest : छत्रपती संभाजीनगर ग्रामीण भागातील इंटरनेट बंद करण्याचे गृह विभागाने आदेश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व टेलिकॉम कंपन्यांना या आदेशाचे पालन करण्याची सूचना केली आहे.
राज्यभरातील मराठा आंदोलन आणि सर्व पक्षीय बैठकीचे सर्व अपडेट्स पाहा लाईव्ह...
Maratha Reservation: नागपूरच्या महाल भागात आरक्षणाला घेऊन मराठा संघटनेकडून साखळी उपोषण सुरु आहे. आज दुसऱ्या दिवशी मनोज जरांगे याच्या आंदोलनाच्या समर्थानात मुंडन आंदोलन केले जाते आहे.
Nashik News: मराठा आरक्षणाच्या मागणीची तीव्रता आता वाढू लागली असून नाशिकच्या येवला तालुक्यात त्याचे तीव्र पडसाद उमटत आहे. छत्रपती संभाजी नगर - नाशिक महामार्गावर आंगणगाव येथील सकल मराठा समाज आंदोलकांनी रास्ता- रोको आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे महामार्गावरची वाहतूक पूर्ण विस्कळीत झाली असून दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध केल्याने येवला तालुक्यात ठिकठिकाणी मराठा समाजा तर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन होत असल्याचे पहावयास मिळत आहे.
Parbhani News : परभणी जिल्ह्यात आता मराठा आरक्षण आंदोलन तीव्र होताना दिसून येत आहे. परभणीच्या पूर्णा तालुक्यातील तहसील कार्यालयावर पेट्रोलची बॅग टाकून पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे मात्र कर्तव्यावर असलेल्या नायब तहसीलदार आणि तहसीलच्या इतर कर्मचाऱ्यांनी तात्काळ आग विरोधक यंत्राच्या माध्यमातून ही आग विझवली असून पेट्रोलची बॅग टाकून पेटवून देणारे दोन जण पळून गेले आहेत या घटनेनंतर तहसील परिसरात मोठी गर्दी जमली असून पोलीस पंचनामा करण्यासाठी तहसील कार्यालयात दाखल होत आहेत.
Maratha Reservation Protest: सांगोला तालुक्यातील एकतपूर येथे संतप्त मराठा आंदोलकांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढून अंत्यसंस्कार केले.
Sangli News : सांगलीच्या पलूस तालुक्यातील अंकलखोप येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. यासाठी आज सरकारला आरक्षण देण्याची सुबुद्धी लवकर यावी यासाठी होम घालण्यात आला. औदुंबर येथील दत्त महाराजांना यावेळी साकडे घालण्यात आले. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या गजरात उपोषण करत्यानी अगदी देवाला सुध्दा साकडे घातले आहे. या सरकारला जाग येणार कधी असा प्रश्नच आता जणू काही देवालाच विचारला जात आहे. मराठा समाजाला योग्य न्याय आता देव तरी देईल का? असा प्रश्न या निमित्ताने पडला आहे. कारण सद्या राजकीय नेते आणि सरकारला राजकारणातून समाजाला लक्ष द्यायला वेळच नाही मतदान आले की फक्त समाज दिसतो. परंतु समाजावरील अन्याय त्यांना दिसत नाही अशी संतप्त प्रतिक्रिया समाज बांधवांच्या कडून उमटत आहे.
Yavatmal News: शासन आपल्या दारी कार्यक्रमात मुख्यमंत्र्याच्या दिशेने बुट भिरकावनाऱ्याला ताब्यात घेवून त्याच्याविरुद्ध यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला. संतोष नथ्थूजी गदई (40), रा. जामडोह) असे या इस्माचे व्यक्तीचे नाव आहे. शहरालगतच्या किन्ही येथे सोमवार ऑक्टोबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमस्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झाल्यानंतर संतोष गदई याने बुट भिरकावीत मानवी जीवितास व लोकांच्या सुरक्षीततेस धोका निर्माण होईल, असे कृत्य केले. ही बाब शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात येताच त्यांनी संतोष गदई याला चोप देऊन ग्रामीण पोलिस ठाण्यात आणण्यात आले. या प्रकरणी पोलिस कर्मचारी प्रवीण वैद्य यांनी दिलेल्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिस ठाण्यात संतोष गदई याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास ठाणेदार प्रकाश तुनकलवार करीत आहे
Sangli News: मराठा आरक्षण आंदोलनामुळे शंभराव्या नाट्य संमेलनाचा सांगलीत होणार मुहूर्तमेढ कार्यक्रम तूर्तास रद्द करण्यात आले आहेत. 4 आणि 5 नोव्हेंबर रोजी रंगभूमी दिनी सांगलीत पार पडणार होता मुहूर्तमेढचा कार्यक्रम. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि मंत्री उदय सामंतसह नाट्य क्षेत्रातले दिग्गज कलाकार उपस्थित राहणार होते. यंदाचे शताब्दी वर्ष असल्यानं रंगभूमी असणाऱ्या मुहूर्तमेढ सोहळ्याचं आयोजन सांगलीत करण्यात आलं होतं.
Mumbai News: मुंबईत मंत्रालय परिसरात सर्वपक्षीय आमदारांनी आंदोलन केलं. काही वेळापूर्वी आमदारांनी मंत्रालयाच्या गेटला टाळंही लावलं होतं. सत्ताधारी आमदारांचाही आंदोलनात सहभाग होता. मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची आमदारांची मागणी होती. अखेर पोलिसांनी आमदारांना ताब्यात घेण्यास सुरू केली.
Mumbai News: मुंबईत मंत्रालय परिसरात सर्वपक्षीय आमदारांनी आंदोलन केलं. काही वेळापूर्वी आमदारांनी मंत्रालयाच्या गेटला टाळंही लावलं होतं. सत्ताधारी आमदारांचाही आंदोलनात सहभाग होता. मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची आमदारांची मागणी होती. अखेर पोलिसांनी आमदारांना ताब्यात घेण्यास सुरू केली.
Mumbai News : ससूनडॉक कुलाबा येथील सखल मराठा समाजाच्या वतीनं रमेश जरांगे पाटील हे मराठ्यांच्या आरक्षणासाठी आमरण उपोषाण करत असलेल्या आंदोलनाला ससून डॉक येथील सर्व मराठी व्यवसायिकांच्या वतीनं कृष्णा दादा पवळे यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी आपला व्यवसाय ऐक दिवस बंद ठेवून मराठ्यांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतीचे पूजन करून मोठ्या संख्येने जरांगे पाटलाच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.
Dharashiv News: मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीसाठी धाराशिव तालुक्यातील खेड गावातील तरुणांनी बीएसएनएल टॉवरवर चढून आंदोलन सुरू केलं आहे.
Pune News : पुण्यातील नवले पूल जाळपोळ प्रकरणी 400 ते 500 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करून गर्दी जमा केल्याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिंहगड रोड पोलीस ठाण्यात कलम 336 आणि कलम 441 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जवळपास 400 ते 500 जणांवर हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुण्यातील नवले पुलावर काल दुपारी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी काही तरुणांनी नवले पुलावर आंदोलन केलं होतं. या आंदोलनावेळी मुंबई बंगळुरू महामार्गावर टायर जाळण्यात आले होते.
Solapur News : सोलापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सोलापुरात शेकडो महिलांचा कॅन्डल मार्च काढण्यात आला. गवळी वस्ती तालीम संघाच्यावतीने हा कॅण्डल मार्च काढण्यात आला. एक मराठा, लाख मराठाचा घोषणा देत हा मार्च काढत संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
ST Bus : राज्यातील मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी एसटी विभागाच्या वतीनं महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सोलापूर, बीड, अक्कलकोट, नांदेड, लातूर आंबेजोगाईला जाणाऱ्या एसटीच्या 25 फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. वातावरण पूर्ववत झाल्यानंतर सेवा नियमित करणार असल्याचं रत्नागिरी विभाग नियंत्रकांनी सांगितलं आहे.
Nashik News : मराठा समाज आरक्षणासाठी नाशिकच्या सटाणा येथे सकल मराठा समजाच्या वतीने 'कॅन्डल मार्च' काढण्यात आला. या कॅन्डल मार्च मध्ये सटाणा शहरातील मराठा बांधवांसह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या या प्रमुख मागणीसाठी सुरू असलेल्या आंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांच्या अमरण उपोषण समर्थनार्थ सटाणा शहरात साखळी उपोषण देखील सुरू आहे.
Solapur News : सोलापुरात काल मराठा आंदोलकानी आक्रमक भूमिका घेतं ठिकठिकाणी आंदोलन केले. आज देखील सोलापुरात मोठ्या प्रमाणात आंदोलन होण्याची शक्यता आहे. सोलापुरातल्या कोंडी गावात मागील 7 दिवसापासून आमरण उपोषण सुरु आहे.. यापूढे जाऊन आज गावात चूलबंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे आज कोंडी ग्रामस्थ एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहेत.
सकाळी 10.30 वाजता सोलापुरातील तळे हिप्परगा येथे प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून आंदोलन करण्यात येणार आहे. गावातील तरुणाची प्रतिकात्मक अंत्य यात्रा काढून स्म्शानभूमीत सरणावर झोपून आंदोलन केलं जाणार आहे.
सत्ताधारी असलेल्या शिंदे गटाचे सोलापूर जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत पक्षीय भूमिका बाजूला ठेवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे असलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या मुख्य कार्यालयावरील होर्डिंग काढून मराठा क्रांती मोर्चा चे होर्डिंग लावण्यात येणार आहे.
Mumbai News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्य सरकारकडून सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आलीय. बैठकीसाठी सर्व पक्षांमधून काही नेत्यांनी निमंत्रण देण्यात आलं आहे.
सर्वपक्षीय बैठकीत काय होणार ?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत बोलवलेल्या सर्व पक्षीय बैठकीत आरक्षणाबाबत विविध पक्षांची आरक्षणाबाबत मतं जाणून घेतली जाणार
निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीने सादर केलेला अहवाल सर्व पक्षीय बैठकित मांडून त्यावर सर्व पक्षीय नेत्यांशी बैठकित चर्चा करणार
मराठा आरक्षणाला कायद्याच्या चौकटीत राहून आरक्षण मिळावं, यासाठी अन्य काही कायदेशीर उपाय योजना करणं गरजेचं आहे का ? याबाबत निमंत्रीत सर्व पक्षांच्या नेत्यांकडून माहिती घेणार
तसेच सर्वच पक्षांकडून राज्यात उद्भवलेल्या कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याबाबत राज्य सरकारला सहकार्य करण्याचे आवाहन केले जाणार
Manoj Jarange Patil : जालना : मनोज जरांगे यांनी सरकार काल दिलेल्या अलटीमेटमनुसार, आज संध्याकाळपर्यंत सरकारने विशेष अधिवेशन बोलवून कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमध्ये समावेश न केल्यास आपण आज संध्याकाळपासून पाण्याचा त्याग करणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे सरकार पुढे आणखी पेच वाढलाय.
Maharashtra Parbhani News : आज परभणीत जिल्हा बंदची हाक देण्यात आली असून मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून जिल्हा बंद राहणार आहे. झरी बोरी आणि शिंगणापूर फाट्यावर रास्ता रोको करण्यात येणार आहे.
परभणी जिल्ह्यात मराठा आरक्षणाचा लढा तीव्र होताना दिसून येत आहे परभणीच्या सावली विश्रामगृहावर सकल मराठा समाजाचे शेतकरी पुत्रांची बैठक झाली यामध्ये तीन दिवसांचे वेगवेगळे आंदोलन ठरवण्यात आले काल जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी रास्ता रोको नंतर आज परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे उद्याच्याला सर्व शेतमाल वाहतूक जी आहे ती बंद केली जाणार आहे. मराठा आरक्षण अन मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून हे आंदोलन केले जात आहे एकीकडे साखळी उपोषण आणि दुसरीकडे रस्त्यावर उतरून आंदोलन केले जात आहे. या बंद बरोबरच झरी बोरी आणि सिंगणापूर या तीन ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले जाणार आहे.
Maharashtra Beed News Updates: बीड : मराठा आंदोलनाला बीड जिल्ह्यात सोमवारी गालबोट लागल्यानंतर रात्री उशिरा संचारबंदी लागू करण्यात आली. मंगळवारी पोलिसांकडून तोडफोड करणाऱ्या आंदोलकांची धरपकड सुरू करण्यात आली आहे.
संचारबंदीच्या पहिल्या दिवशी केवळ आंदोलकांना अटक करणे हेच टार्गेट ठेवण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून नुकसानीची वसूली करण्याची प्रक्रिया सुरू करणार असल्याची माहिती पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकुर यांनी दिली. तसा आदेश यापुर्वीच्या खंडपीठाच्या निवाड्यात आला आहे आहे.
सोमवारी बीड शहर, माजलगाव येथे आंदोलकांविरोधात कारवाई सुरू करण्यात आली. यावेळी दुपारपर्यंत जिल्ह्यात 84 जणांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या विरुद्ध भादंवि 307, 308 आणि इतर संदर्भातील गुन्हे दाखल करण्यात आल्याचेही यावेळी ठाकुर यांनी सांगितले. सरकारी मालमत्तांच्या नुकसानीबाबत निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी म्हणाले की, सरकारी मालमत्तांचे पंचनामे सुरु आहेत.
पार्श्वभूमी
Maharashtra Maratha Reservation Protest LIVE Updates: मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाचा आजचा आठवा दिवस आहे. मनोज जरांगेंनी सरकारला संध्याकाळपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. तसेच, तात्काळ विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणाचा निर्णय घ्या, नाहीतर आजपासून पुन्हा पाणी पिणं बंद करणार असल्याचा इशारा मनोज जरांगेंनी सरकारला दिला आहे. तसेच, मराठा आरक्षणासाठी आज सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जमावबंदी, पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई
छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) राज्यात सुरू असलेल्या आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यात प्रशासनाकडून जमावबंदीचे आदेश काढण्यात आले आहे. त्यामुळे या काळात कोणालाही आंदोलन, निदर्शने किंवा मोर्चे काढण्यास परवानगी नसणार आहे. सोबतच सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या काळात सार्वजनिक ठिकाणी कोणतेही शस्त्र किंवा शरीराला इजा पोहचेल अशा वस्तू देखील वापरता येणार नसल्याचं प्रशासनाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे.
मराठा आरक्षणावरून राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना समोर आल्या होत्या. सोबतच मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात देखील दगडफेकीच्या घटना समोर येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रशासन देखील अलर्ट झाला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाकडून ग्रामीण भागासाठी जमाबंदीचे आदेश काढले आहे. त्यामुळे या काळात आता पाचपेक्षा अधिक लोकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यास मनाई असणार आहे.
मराठा आरक्षणप्रश्नी सह्याद्री अतिथीगृहावर आज सर्वपक्षीय बैठक
मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) विषयावर सह्याद्री अतिथीगृहावर (Sahyadri Guest House) आज सकाळी साडेदहा वाजता सर्वपक्षीय बैठक पार पडणार आहे. मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याचा सरकारचा मानस आहे. त्यामुळे राज्यातील मराठा समाजाची दाहकता कमी करण्यासाठी या बैठकीत चर्चा होईल. शरद पवार (Sharad Pawar), अशोक चव्हाण (Ashok Chavan), अंबादास दानवे (Ambadas Danve), उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale), संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांच्यासह सर्वपक्षीय नेते हजर राहणार आहेत.
मराठा आरक्षणाच्या विषयावर सह्याद्री अतिथीगृहावर सकाळी साडेदहा वाजता सर्वपक्षीय बैठक पार पडणार आहे. मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याचा सरकारचा मानस आहे. मराठा आरक्षण आंदोलनामुळे महाराष्ट्रातील शांतता सुव्यवस्था टिकवण्याकरता सर्वपक्षीयांचा सहयोग आवश्यक असल्याचं सरकारचं मत आहे. आंदोलनाला हिंसक वळण लागू नये याकरता सर्वपक्षीय लोकप्रतिनीधींनी आवाहन करणं गरजेचं असल्याचंही सरकारचं म्हणणं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -