मुंबई : आम्हाला कुणाच्या भांडणाशी देणंघेणं नाही, आमच्या मराठा समाजाला न्याय द्या. कोणत्या पक्षाच्या वतीने किंवा राजकीय भूमिका घेऊन बोलत नाही. मला कोणत्याही पक्षावर टीका करायची नाही, असं खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे. आरक्षणाच्या प्रश्नामुळं मराठा समाज अस्वस्थ आहे. मी असल्यामुळं मराठा समाज शांत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती मराठा आरक्षण (Maratha Reservation) प्रश्नी मागील काही दिवसांपासून खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी महाराष्ट्र दौरा केला. त्यानंतर आता त्यांनी मुंबईत आल्यानंतर मुख्यमंत्र्यांसह विविध पक्षांचे प्रमुख आणि वरिष्ठ नेते यांच्या भेटीगाठी घेतल्या. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते म्हणाले की, मी सकल मराठा समाजाच्या वतीने मी बोलत आहे. कोणत्या पक्षाच्या वतीने किंवा राजकीय भूमिका घेऊन बोलत नाही. मी महाराजांचा वंशज आहे. 1917 ला शाहू महाराज म्हणाले की मी मराठ्यांचं नेतृत्व करत नाही तर मी शिपाई म्हणून नेतृत्व करायला आलो आहे. आता आपण सामाजिक मागास राहिलेलो नाही. ऑगस्ट 2017 मध्ये मी आझाद मैदानात स्टेजवर गेलो आणि भूमिका घेतली कारण त्या ठिकाणी जातीय तेढ निर्माण होणार होती. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला तो सर्वोच्च होता. मी त्यावेळी भूमिका घेतली माझ्यावर टीका झाली. आम्हाला भांडण करण्यात घेणंदेणं नाही आम्हाला न्याय पाहिजे. समाजाला वेठीस धरू नका, असं ते म्हणाले.
खासदार संभाजीराजे म्हणाले की, खासदार आणि आमदार यांची ही जबाबदारी होती. मी नाशिकमध्ये अस्वस्थ होऊन आक्रमक झालो. लोकांच्या भावना समजून घेण्यासाठी मी महाराष्ट्र दौरा केला. लोक आक्रमक आहेत. ते माझ्यामुळे शांत आहे. 30 टक्के श्रीमंत मराठे लोक आहेत ते रस्त्यावर येत नाहीत 70 टक्के गरीब लोक रस्त्यावर येत आहेत. मी तीन पर्याय सांगितले आहेत ते सर्वांनी मान्य केले आहेत, असं त्यांनी सांगितलं.
संभाजीराजे यांनी सांगितलेले तीन मुद्दे
- रिव्हीव्ह पिटीशन दाखल करायला 4 तारीख आहे पण कोविड मुळे ती पुढे गेली आहे. रिव्हीव्ह पिटीशन लोकांना दाखवण्यासाठी फाईल करू नका तर फुलप्रुफ असावा हा पहिला पर्याय.
- दुसरा पर्याय क्युरिटीव्ह पिटीशन हा आहे
- तिसरा पर्याय 342-A नुसार राज्यपाल यांच्याकडे प्रस्ताव जाईल तो पुढे राष्ट्रपती आणि त्यानंतर संसदेकडे जाईल
खासदार संभाजीराजे म्हणाले की, अनेक लोकांची इच्छा आहे की आपण ओबीसीमध्ये जावा. नवीन प्रवर्ग तयार करता येतो का हे शरद पवार, मुख्यमंत्री ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं पाहिजे. वंचितांना पहिलं आरक्षण मिळालं पाहिजे ही माझी भूमिका आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका होती. मी मगाशी उद्धव ठाकरे यांच्या कानावर टाकलं. तुमच्या हातात आहे ते तुम्ही करू शकता, असं ते म्हणाले.
9 सप्टेंबर 2020 च्या आधी झालेल्या नियुक्त्या करून टाका अस सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. राज्याच्या हातात ते आहे मग करून टाका. कशाला ठेवता, लोकं अक्षरशः रडत आहेत, असं ते म्हणाले. सारथीच्या समितीमध्ये समाजाची माणसं घ्या. आयएएस अधिकारीच का? सारथीला किमान एक हजार कोटी रुपये द्या. अण्णासाहेब पाटील महामंडळ पुनर्उभारणी झाली पाहिजे. हे तुमच्या हातात आहे ते तर द्या. 30 टक्के श्रीमंत आहे त्यांना सोडून द्या पण 70 टक्के गरीब आहे त्यांना तर सवलती दिल्या पाहिजे, असं ते म्हणाले.