सातारा : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जरी असला तरी राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत आपली जबाबदारी स्वीकारली पाहिजे. वेगवेगळ्या पक्षातील ज्येष्ठ लोकांनी आतापर्यंत आपली भूमिका का स्पष्ट मांडली नाही असा सवाल उपस्थित करत नाव न घेता शरद पवार यांना टोला लगावला आहे. मराठा समाजाने यापुढे आंदोलन करू नये असं सांगत निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना रस्त्यात आडवा आणि घरातून बाहेर फिरू देऊ नका असे आवाहन मराठा समाजाला केलं आहे.


सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी (5 मे 2021) मराठा आरक्षण रद्द केल्याचा निर्णय दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने हे आरक्षण वैध असल्याचा दिलेला निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने रद्द ठरवला आहे. राज्यातील मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास नसल्याचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. या निर्णयानंतर राजकीय प्रतिक्रियांना उत आला आहे. आज भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.


आमदार, खासदारांना घराबाहेर पडू देऊ नका : खासदार उदयनराजे
हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जरी असला तरी राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत आपली जबाबदारी स्वीकारली पाहिजे. मराठा समाजाने यापुढे आंदोलन करू नये असं सांगत निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना रस्त्यात आडवा आणि घरातून बाहेर फिरू देऊ नका असे आवाहन मराठा समाजाला केलं आहे.


उद्रेक नकोच; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल दुर्दैवी : खासदार संभाजीराजे छत्रपती
सद्य परिस्थिती पाहता न्यायालयानं दिलेल्या निकालाचा आदर करत समाजातील नागरिकांनी उद्रेकाची भाषाही करु नये असं आवाहन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केलं. मराठा आरक्षणाच्या सुनावणीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हा निकाल समाजाच्या दृष्टीनं दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया दिली. 'मराठा आरक्षण म्हणजे, गरिब मराठ्यांसाठीचाच हा लढा होता. जातीय विषमता कमी होईल यासाठी हा आमचा प्रयत्न होता. असं असतानाच आता हा कायदा रद्द करण्यात आला आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल स्वीकारार्ह पण दुर्दैवी आहे', असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले.