नवी दिल्ली : जर केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदी यांनी दखल घेतली नाही, तर गाठ आमच्याशी आहे. आम्ही दिल्लीत ठाण मांडून बसू,थंडीत आंदोलन करु असा इशारा माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी दिला.  मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) दिल्लीमध्ये सर्वपक्षीय खासदारांची बैठक पार पडली. सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा धग धरतोय. त्याच पार्श्वभूमीवर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिल्लीत सर्वपक्षीय खासदारांच्या बैठकीचं आयोजन केलं. याच प्रश्नासंबंधी त्यांनी मागे केंद्रीय मागासवर्ग आयोगाची भेट घेतली होती. दिल्लीतील महाराष्ट्र सदनमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. 


या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, नितीन गडकरी, नारायण राणे हे देखील उपस्थित राहणार असल्याची शक्यता होती. तसेच संभाजीराजे छत्रपती यांनी अनेक खासदारांना देखील निमंत्रित केले. या बैठकीमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे असं मत सर्वांनी व्यक्त केल्याची माहिती समोर आलीये. 


तर गाठ आमच्याशी - संभाजीराजे छत्रपती


शासकीय नोक-या आणि शैक्षणिक आरक्षणात मराठा समाजाचे प्रतिनिधीत्व 48 पैकी मोजले आहे. मराठा समाजाचे प्रतिनिधीत्व पुरेसे असल्याचं मत सुप्रीम कोर्टाचे झाले. त्यामुळे ते 48 टक्के नाही तर 100 टक्क्यांपैकी प्रतिनिधीत्व मोजावे. केंद्र सरकार आणि पंतप्रधान यांनी याची दखल घ्यावी. जर या ठरवाप्रमाणे केंद्र सरकारनं लक्ष दिलं नाही तर मग गाठ आमच्याशी आहे. आम्ही दिल्लीत ठाण मांडून बसू. सगळे मराठे दिल्लीच्या थंडीत आंदोलन करतील, असा इशारा माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिलाय. 


जरांगे यांच्यामुळे हा प्रश्न ऐरणीवर आलाय - संभाजीराजे छत्रपती


 मला मनापासून आनंद होतोय आणि तितकेच दुःख सुद्धा होतंय.मी पहिल्यांदा हा विषय मांडला याचा आनंद आहे. तो पर्यंत कोणी विषय मांडला नव्हता. आता अनेक खासदार गरीब मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी परखडपणे बाजू मांडत आहेत. मनोज जरांगे यांच्यामुळे हा विषय पुन्हा ऐरणीवर आला. मराठा आरक्षण का मिळावं हे अनेकांनी सांगितलंय. पण कसं मिळावं यावर चर्चा व्हायला पाहीजे. मी बैठकीत स्पष्टपणे सांगितले की राज्य मागासवर्गीय आयोगाला भेट दिल्यावर समाजाच्या भावना मांडल्या. आम्हाला 50  टक्केच्या आत आरक्षण पाहीजे. हा मुद्दा मांडला. यावर दोन्ही मागासवर्गीय आयोगानं यावर उत्तर दिलं नाही, असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं. 


मंडल आयोगाच्या वेळी यावर तोडगा निघायला हवा होता- छत्रपती उदयनराजे भोसले


बंधूराज संभाजीराजेंनी सर्वपक्षीय बैठक  बोलावली होती. आरक्षण मिळायला हवं यावर सर्वांनी सहमती दर्शवली आहे. मनोज जरांगे यांच्या मनात जी भावना आहे तीच सर्वांची भावना आहे. अद्याप मराठा समाजाला न्याय मिळाला नाही. शिवाजी महाराजांचे जे ब्रीदवाक्य होतं सर्वधर्म समभाव, त्यानुसार न्याय मिळायला हवा. आज चूक कोणाची हे काढण्यापेक्षा न्याय कसा मिळाला पाहीजे यावर सहमती झालीय. 40 वर्षांचा काळ कमी नाही, अनेकांचे आरक्षणाचे स्वप्न तसेच राहीले. मंडल आयोगाच्या वेळी यावर तोडगा निघायला पाहीजे होता, असं मत खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केलं आहे. 



बैठकीसाठी आलेले खासदार -


१) धैर्यशील माने, शिवसेना (शिंदे गट) हातकणंगले लोकसभा मतदारसंघ


२) श्रीकांत शिंदे, शिवसेना (शिंदे गट) कल्याण डोंबवली लोकसभा मतदारसंघ


३) धनंजय महाडीक, भाजप (राज्यसभा) महाराष्ट्र


४) संजय मंडलिक, शिवसेना (शिंदे गट) लोकसभा कोल्हापूर


५) हेमंत गोडसे, शिवसेना (शिंदे गट) लोकसभा मतदारसंघ नाशिक


६) ओमराजे निंबाळकर, शिवसेना (ठाकरे गट) धाराशिव लोकसभा मतदारसंघ


७)उदयनराजे भोसले राज्यसभा (भाजप) महाराष्ट्र 


८ )राहुल शेवाळे लोकसभा मतदारसंघ  दक्षिण मध्य मुंबई (शिवसेना शिंदे गट)


०९) केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार  दिंडोरी लोकसभा मतदारासंघ (भाजप)


१०) प्रतापराव जाधव खासदार (शिवसेना शिंदे गट) बुलढाणा मतदारसंघ 


११) रावसाहेब दानवे (भाजप) जालना लोकसभा मतदारसंघ


१२) सुधाकर शृगारे (भाजप) लातूर लोकसभा 


१३) गजानन किर्तीकर, शिवसेना (शिंदे गट) -  उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघ 


१४) भावना गवळी, शिवसेना (शिंदे गट)- यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ


१५) रणजित निंबाळकर, भाजप - म्हाडा लोकसभा मतदारसंघ


१६) प्रतापराव चिखलीकर , भाजप, नांदेड लोकसभा


१७) प्रफुल्ल पटेल, राज्यसभा , राष्ट्रवादी काँग्रेस - अजित पवार गट


१८) रणजित निंबाळकर, भाजप



हेही वाचा :


Eknath Shinde : राज्यातील बळीराजाला दीड वर्षांत 44 हजार 278 कोटी रुपयांची विक्रमी मदत, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्सचं पुनर्गठन