पुणे : ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) मुंबईतील आझाद मैदानावर (Azad Maidan) अमरण उपोषण करणार आहे. यासाठी जरांगे यांनी आंतरवाली ते मुंबई अशी पायी दिंडी काढली आहे. जरांगे यांची हीच पायी दिंडी पुण्यात (Pune) दाखल झाली आहे. दरम्यान, याच आंदोलनात मनोज जरांगे यांनी चक्क 'एबीपी माझा'चे पत्रकार म्हणून रिपोर्टिंग केलं. मराठा आंदोलक म्हणून चर्चेत असलेल्या जरांगे यांनी यावेळी मात्र पत्रकार (Journalist)  म्हणून आंदोलनाची माहिती सुद्धा दिली.


बुधवारी आंदोलनात मनोज जरांगे यांनी काही वेळेसाठी पत्रकाराची भूमिका बजावली. यावेळी जरांगे चक्क 'एबीपी माझा'चे पत्रकार झाले. नेहमी आंदोलक म्हणून मराठा समाजाची बाजू मांडणाऱ्या जरांगेंनी पत्रकाराच्या भूमिकेतून मराठा आरक्षणाची बाजू मांडली....नमस्कार मी मनोज जरांगे असे म्हणत मनोज जरांगे यांनी आपल्या रिपोर्टिंगची सुरुवात केली. 'तसेच मी माझ्या कॅमेरामॅनला सांगतो की, त्यांनी आंदोलनातील गर्दी दाखवावी' असं म्हणत जरांगे यांनी मुंबईकडे निघालेल्या आरक्षण रॅलीचं मीडिया कव्हरेज केलं. आंदोलनातील अफाट गर्दीचे चित्र देखील त्यांनी यावेळी दाखवले. आतापर्यंत नेहमी आंदोलक म्हणून पाहायला मिळणारे जरांगे जेव्हा पत्रकार झाले, तेव्हा त्यांची रिपोर्टिंग पाहून अनेकांना त्यांचे वेगळं रूप पाहायला मिळाले. 


आपल्यासोबत आहेत....


दरम्यान यावेळी रिपोर्टिंग करतांना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी निघालेल्या अफाट आणि विराट रॅलीत अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून, ज्यासाठी शब्दच नाही. माझ्या कॅमेरामॅनने हे सर्व दृश्य दाखवावे. हा समुदाय बघा, लहान मुलांपासून वयोवृद्ध मराठ्यांच्या लेकरांना न्याय मिळावा म्हणून ताकतीन एकत्र आला आहे. ही एकजूट कधीच फुटणार नाही आणि तिला कुणाची दृष्टीही लागणार नाही. 'आपल्यासोबत केंडे साहेब आहेत, त्यांना विचारूया तुम्हाला ही रॅली कशी वाटली....' खरंच ही रॅली अभूतपूर्व आहे. कधीच एकत्र न येणार हा समाज आता एकत्र आला आहे. याचा शब्दात वर्णन करणं कठीण आहे. प्रत्येकाला हेवा वाटेल या पद्धतीने मराठा एकत्र आला आहे. यामुळे सर्वांना आनंद होत असेल म्हणतांना, 'कॅमेरामॅन धनंजय दारुंटेसह मी मनोज जरांगे...' असे म्हणून जरांगे यांनी आपली रिपोर्टिंग संपवलं.



आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस...


मराठा समाजाला ओबीसमधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे मुंबईत आमरण उपोषण करणार असून, यासाठी त्यांनी आंतरवाली सराटी ते मुंबई अशी पायी दिंडी काढली आहे. जरांगे यांची पायी दिंडी सध्या पुण्यात असून, त्यांच्या या पायी दिंडीचा आजचा सहावा दिवस आहे. तसेच, उद्या जरांगे हे मुंबईत दाखल होणार आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Manoj Jarange Live : भगवं वादळ लोणावळ्यात, पुढील 24 तासात धडकणार मुंबईच्या वेशीवर! मराठा आरक्षणाची प्रत्येक Live अपडेट एका क्लिकवर