मराठा मोर्चा सातारा: साताऱ्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. साताऱ्यात विराट मोर्चा काढण्यात आला आहे. महत्वाचं म्हणजे मोर्चादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शिवेंद्रराजेंनी भाषण सुरु केल्यानंतर मोर्चेकऱ्यांनी घोषणा देत त्यांचं भाषण बंद पाडलं. त्यानंतर उडालेल्या गोंधळामुळे शिवेंद्रराजे, आमदार शशिकांत शिंदे यांना मागे परतावं लागलं.


राजवाडा परिसरातून हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चाबरोबरच अनेक आमदार यात सहभागी झाले होते. मात्र फक्त सहभाग घ्या, भाषण करु देणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली.

आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि आमदार शशिकांत शिंदे दोघेही मोर्चेकऱ्यांसोबत चालत मोर्चात सहभागी झाले. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर, शिवेंद्रराजे भोसले हे भाषणासाठी उभे राहिले. मात्र मोर्चेकऱ्यांना त्यांना बोलू दिले नाही.

या गोंधळानंतर आमदार शशिकांत शिंदे यांनीही उपस्थितांना संबोधण्याचा प्रयत्न केला.  मात्र आंदोलकांनी त्यांनाही रोखले.

परळीत धनंजय मुंडेंचं भाषण

एकीकडे शिवेंद्रराजे भोसले आणि शशिकांत शिदेंना विरोध होत असला तरी परळीतल्या ठिय्या आंदोलनाला धनंजय मुंडेंनी हजेरी लावली आहे. आणि ठिय्या आंदोलनासमोर धनंजय मुंडेंनी भाषणही केलं.