नागपूर : मराठा मोर्चाचं वादळ आता 14 डिसेंबरला नागपूरच्या विधीमंडळावर धडकणार आहे. पुण्यात मराठा क्रांती मूक मोर्चाची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी मराठा मोर्चाचे राजेंद्र कोंढरे यांनी नागपुरातल्या मोर्चाची घोषणा केली.
52 ठिकाणी मराठा समाजाचे मोर्चे काढूनही सरकार गंभीर नाही. त्यामुळे या अधिवेशनाच्या काळात प्रश्न न सुटल्यास आंदोलन अधिक तीव्र करु आणि 14 तारखेनंतर जे होईल त्याला सरकार जबाबदार राहील असा इशाराही यावेळी देण्यात आला.
राज्यातील बहुतेक जिल्ह्यात मराठा मोर्चाचं वादळ पाहायला मिळालं. गेल्या दोन महिन्यांपासून विराट संख्येने हे मोर्चे निघत आहेत. नुकतंच मुंबईत मराठा मोर्चाची बाईक रॅली झाली. यावेळीही मोठी गर्दी पाहायला मिळाली होती.
कोपर्डी बलात्कारातील आरोपींना तात्काळ फाशी द्या, मराठा समाजाला आरक्षण द्या आणि अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करा, अशी मागणी या मोर्चाद्वारे करण्यात येत आहे.