बेळगाव : मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये गोकुळ अष्टमीनिमित्त दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शिवाजी स्टेडियमवर आयोजित दहीहंडी कार्यक्रमाच्यावेळी जवानांनी लेझीम आणि मल्लखांबाची प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

मराठा सेंटरचे ब्रिगेडियर गोविंद कलवड यांच्या हस्ते दहीहंडीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर लेझीमची प्रात्यक्षिके जवानांनी सादर केली. लेझीमनंतर मल्लखांबाची प्रात्यक्षिके जवानांनी सादर करून आपल्या कौशल्याचे दर्शन घडवले.

दही हंडी स्पर्धेत ट्रेनिंग, रेकॉर्ड आणि ऍडम बटालियन या तीन संघानी भाग घेतला होता. पहिल्या फेरीत तिन्ही संघानी आपली ताकद अजमावून उंचीचा अंदाज घेतला.



दुसऱ्या फेरीनंतर मात्र प्रत्येक संघाने दहीहंडी फोडण्यासाठी पाण्याच्या माऱ्याला तोंड देऊन आपला तोल ढळू न देता हंडी फोडण्याचा आटोकाट प्रयत्न केला.

‘शिवाजी महाराज की जय’च्या घोषणाही गोविंदा देत होते. शेवटी ट्रेनिंग संघाच्या गोविंदा पथकाने दहीहंडी फोडली. दहीहंडी फोडल्यावर ट्रेनिंग बटालियनच्या जवान अधिकाऱ्यांनी एकच जल्लोष केला.

दही हंडी स्पर्धा पाहण्यासाठी लष्करी अधिकारी, शहरातील मान्यवर निमंत्रित, जवान आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.