परभणी : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात सुरु असलेली मराठा आरक्षण आंदोलनाची धग आता ग्रामीण भागातही पोहोचली आहे. पाथरी तालुक्यातील चार गावांनी जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळांवर बहिष्कार टाकला आहे. यामुळे या चारही गावातील 1500 विद्यार्थी शाळांमध्ये जात नाहीत. त्यामुळे शाला ओस पडल्या आहेत.


गेल्या अनेक दिवसांपासून आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. ठोक मोर्चे, चक्काजाम, रास्तारोको, शहरबंद इत्यादी आंदोलने करण्यात आली. काही ठिकाणी या आंदोलनांना हिंसक वळणही मिळालं. या आंदोलनाचं पुढचं पाऊल म्हणून पाथरी तालुक्यातील टाकळगव्हाण, सारोळा, कानसुर आणि वाघाळा या चार गावांनी विद्यार्थ्यांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

मराठा समाजाने गेल्या दोन वर्षात 58 मूकमोर्चे काढले. हे सर्व मूकमोर्चे अत्यंत शांततेत निघाले. मात्र सरकारने या मोर्चांची गंभीर दखल घेतली नाही, असा आरोप करत, मराठा मोर्चाने अखेर ठोक मोर्चे काढण्यास सुरुवात केली आणि आंदोलनाला आक्रमक रुप दिलं.

मराठा समाजाला न्याय मिळत नाही, मग न शिकलेलं बरं, अशी भूमिका पाथरी तालुक्यातील चार गावांनी घेतली आहे.

मराठा समाजाने शाळांवर टाकलेल्या या बहिष्कारामुळे या चारही गावांमधील शाळा ओस पडल्या आहेत. जवळपास 1500 विद्यार्थी शाळांमध्ये जात नसल्याने शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या कमालीची रोडावली आहे. जवळपास 70 ते 80 टक्के विद्यार्थी शाळांमध्ये नाहीत.