बीड : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आज (बुधवार) दुपारी सुरु झालेलं आंदोलन अधिक तीव्र झालंय. जोपर्यंत राज्य सरकारच्या नोकरीत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरुच राहणार असा पवित्रा मोर्चेकऱ्यांनी घेतला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आज दुपारी बीड जिल्ह्यातील परळीमधून एल्गार पुकारण्यात आला.


आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महापूजा करु देणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने मराठा बांधव सहभागी झाले होते. परळीच्या शिवाजी चौकातून तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.

जर मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर गावागावात जाऊन ठिय्या आंदोलन करू असा इशारा आंदोलकांनी दिला.

चर्चेला येण्याचा प्रस्ताव फेटाळला

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा निरोप घेऊन परळीचे प्रांताधिकारी आंदोलनस्थळी गेले. चंद्रकांत पाटलांनी मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना नागपूरला चर्चेला येण्याचं निमंत्रण पाठवलं होतं. मात्र जोपर्यंत मुख्यमंत्री लेखी आश्वासन देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहिल, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला.

रात्रीतून विविध जिल्ह्यातील आंदोलक या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. रास्ता रोको, बंद, ठिय्या आंदोलन सुरुच राहणार असल्याचं आंदोलकांनी स्पष्ट केलं. आहे.

रात्रभर आंदोलन सुरुच राहणार

आंदोलकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. दुपारी सुरु झालेलं हे आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचं आंदोलकांनी सांगितलं. त्यामुळे आता हे आंदोलन किती लांबतं आणि सरकारला यावर तोडगा काढण्यात यश येतं का त्याकडे लक्ष लागलं आहे.