मुंबई : मुंबईतल्या प्रस्तावित मराठा क्रांती मोर्चाची तारीख निश्चित झाली आहे. क्रांती दिनाचं औचित्य साधत 9 ऑगस्टला मुंबईत मराठा मोर्चा काढण्यात येईल, अशी माहिती शिवप्रहार संघटनेचे प्रमुख संजीव भोर यांनी दिली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मुंबईत 9 ऑगस्टला जिजामाता उद्यान ते आझाद मैदानापर्यंत मराठी क्रांती मोर्चा काढण्यात येईल. मोर्चाच्या व्यवस्थापनाची रणनीती 13 जुलैला कोपर्डीत होणाऱ्या बैठकीत ठरवणार असल्याचं संजीव भोर यांनी सांगितलं.

एक जून रोजी होणाऱ्या शेतकरी संपाला मराठा म्हणून सहभागी होऊ. शिवाय, शेतकऱ्यांच्या या संपाला पाठिंबाही आहे, अशी माहितीही संजीव भोर यांनी दिली.

कोपर्डी प्रकरणाचा निषेध करत औरंगाबादमधून मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात झाली. त्यानंतर राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मराठा मोर्चे निघाले आणि प्रचंड प्रतिसादही मिळाला. त्यामुळे राज्याची राजधानी असलेल्या मुंबईतील मराठा क्रांती मोर्चाकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.