बेळगाव : विविध मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या मराठा क्रांती मोर्चात भगव्या महासागराचे दर्शन घडले. नजर जाईल तेथपर्यंत भगवे झेंडे, भगव्या टोप्या, भगवे फेटे यांचेच दर्शन होत होते. मोर्चादरम्यान शहरात मोर्चाचा मार्ग सोडला तर संचारबंदी सदृश्य स्थिती होती.
बेळगावातील मराठा मोर्चाच्या मागण्या
महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न सोडवणुकीसाठी सहकार्य करावे, कोपर्डी आणि अन्य ठिकाणी घडलेल्या घटनेतील गुन्हेगारांना कठोर शासन करावे, अॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करावी, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, सरकारी परिपत्रके मराठीत द्यावीत, शेतकऱ्यांच्या समस्या दूर कराव्यात, या बरोबरच अन्य मागण्यासाठी मराठा समाजाने मराठा क्रांती मोर्चा काढून समाजाच्या अभेद्य एकीचे आणि आपल्या ताकदीचे दर्शन घडवले.
छत्रपती शिवाजी उद्यान येथून सुरु झालेल्या मराठा क्रांती मोर्चाची आघाडी विद्यार्थिनी, तरुणी आणि महिलांनी सांभाळली होती. भगवे फेटे, भगवे टोप्या परिधान करून महिला वर्ग मोर्चात सहभागी झाला होता. शहरातील जनतेने आपले सर्व व्यवहार बंद ठेवून मोर्चात सहभागी होऊन आपला उस्फुर्त पाठिंबा मोर्चाला दर्शवला.
बालगोपाळ, वयोवृद्ध यांच्या बरोबरीने अपंग व्यक्ती देखील कुबड्या घेऊन मोर्चात सहभागी झाले होते. पाच किलोमीटर लांब इतकी मोर्चाची व्याप्ती चारही बाजूला होती. परगावच्या अनेक लोकांना रस्त्यावरच थांबावे लागले. मोर्चाच्या वेळी अनेक संघटनांनी पाण्याची पाकिटे, फळे, शीतपेये, चॉकलेट, बिस्किटे यांचे वितरण केले. धर्मवीर संभाजी चौक येथे मोर्चाची राष्ट्रगीताने सांगता झाली. मराठा समाजाच्या मागण्यांचे निवेदन रणरागिणींनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.