Solapur Maratha Akrosh Morcha LIVE Updates : सोलापुरातल्या मराठा संघटनांच्या आक्रोश मोर्चाची सांगता

Maratha Akrosh Morcha LIVE Updates : सोलापुरात आज आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सोलापूर शहरात आज नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरू नये असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 04 Jul 2021 02:06 PM
सोलापुरातल्या मराठा संघटनांच्या आक्रोश मोर्चाची सांगता

सोलापुरातल्या मराठा संघटनांच्या आक्रोश मोर्चाची सांगता करण्यात आली. आक्रोश मोर्चाच्या आयोजकाचं शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे. संचारबंदी झुगारुन सोलापुरातील अनेक आंदोलक मोर्चात सहभागी झाले होते. 

सोलापुरात मराठा संघटनांचा आक्रोश मोर्चा, संचारबंदी झुगारुन मराठा संघटनांच्या आक्रोश मोर्चाला सुरुवात

सोलापुरात मराठा संघटनांचा आक्रोश मोर्चा. मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली असून सोलापुरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अशातच संचारबंदी झुगारुन मराठा संघटनांच्या आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली आहे. संचारबंदी झुगारुन मराठा संघटनांचा आक्रोश मोर्चा सुरु झाला आहे. मोर्चासाठी शेकडो कार्यकर्ते सोलापुरात दाखल झाले आहेत. 

भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख वेशांतर करुन आक्रोश मोर्चाच्या ठिकाणी

पोलिसांनी रस्त्यात अडवल्याने स्वतः रुग्ण असल्याचे भासवत हाताला सलाईन लावून भाजपचे सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख मराठा आक्रोश मोर्चात सहभागी झाले. पोलीस अधीक्षक आणि पोलीस आयुक्तांनी एक ही वाहन येऊ देणार नाही सांगितले होते. पोलिसांच्या माध्यमातून सरकार मोर्चा दडपणाचा प्रयत्न सरकार करत आहे असा आरोप श्रीकांत देशमुख यांनी केला. 

मोहिते पाटील यांच्या गाड्या टेंभुर्णीमधून सोडल्या, 100 पेक्षा जास्त गाड्या सोलापूरकडे रवाना

मोहिते पाटील यांच्या गाड्या टेंभुर्णीमधून सोडल्या. 100 पेक्षा जास्त गाड्या सोलापूरकडे रवाना झाल्या आहेत. या गाड्यांमध्ये माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील , धैर्यशील मोहिते पाटील यांचाही समावेश आहे. 

सोलापुरात मराठा संघटनांचे कार्यकर्ते जमण्यास सुरुवात, पोलिसांनी लावलेले बॅरिकेटिंग ओलांडून आंदोलक आंदोलनस्थळी

सोलापुरात आक्रोश मोर्चासाठी मराठा संघटनांचे कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाली असून पोलिसांनी लावलेले बॅरिकेटिंग ओलांडून आंदोलक आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आंदोलनाला परवानगी दिलेली नाही. मात्र आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. मराठा आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. 

आंदोलनात सहभागी होणाऱ्या बांधवांना शहरात प्रवेश द्या, अन्यथा उद्रेक, आंदोलकांचा इशारा

सोलापूर जिल्ह्यातून शहराकडे येणाऱ्या सर्व रस्त्यावर पोलिसांकडून नाकेबंदी करण्यात आली आहे. एसटी बसमध्ये जाऊन तपासणी करण्याची वेळ पोलिसांवर आली आहे. या आंदोलनात सहभागी होणाऱ्या बांधवांना शहरात प्रवेश द्या, आमच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका अन्यथा उद्रेक होणार असा इशारा आंदोलकांची दिला आहे पोलिसांनी जर प्रवेश दिला नाही तर गनिमी कावा करुन आम्ही मोर्चा यशस्वी करणारच असंही आंदोलकांनी सांगितलंय.

मराठा आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात कडेकोट बंदोबस्त, पोलिसांच्या इतक्या बंदोबस्तात मोर्चेकरी येणार कसे?

सोलापूर : जिल्ह्यातून शहराकडे येणाऱ्या सर्व रस्त्यावर पोलिसांकडून नाकेबंदी करण्यात आली आहे. एसटी बसमध्ये जाऊन तपासणी करण्याची वेळ पोलिसांवर आली आहे. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर-बार्शी रोडवर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. घोरवड्याजवळ चेक पॉईंट करून गाडी तपासणी सुरु आहे. त्यामुळे पोलिसांच्या इतक्या बंदोबस्तात मोर्चेकरी येणार कसे? असा प्रश्न उपस्थित होतोय

कितीही दबाव टाका, पण मोर्चा निघणार, अडवला तर संघर्ष होणार हे नक्की : माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील

सोलापुरातील मराठा समाजाचा आक्रोश मोर्चा दाबण्याचा प्रयत्न केला तर उद्रेक होईल असा इशारा माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना दिला आहे. सोलापूरच्या इतिहासात कधीही इतके बॅरिगेट्स लावले नव्हते, पण तरीही लाखो बांधव मोर्चात सहभागी होणार आहे. कितीही दबाव टाका, पण मोर्चा निघणार, अडवला तर संघर्ष होणार हे नक्की असही पाटील म्हणाले. तर पोलिसांचा दबावासाठी वापर करता लाज वाटत नाही का? असा सवाल यावेळी नरेंद्र पाटील यांनी सरकारला विचारला. मराठा समाजातील तरुणांनी लढण्यास तयार होण्याचं आवाहन करत, आत्महत्येसारखी पावलं कुणी उचलू नये असेही पाटील म्हणाले. संपूर्ण राज्यभरातून मराठा समाजाचे बांधव सोलापूरमध्ये मोर्चात दाखल होणार आहेत. आता यापुढे राज्यभर विनापरवाना मोर्चे काढले जातील असा इशारा नरेंद्र पाटील यांनी सरकाला दिलाय.

मराठा मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात संचारबंदी जाहीर

पोलिसांनी परवानगी नाकारलेली असलेली तरी सोलापुरात आज मराठा आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 11 वाजता सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज चौक या ठिकाणाहून या मोर्चाला सुरुवात होईल. जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा निघणार असल्याची माहिती संयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने या मोर्च्याला परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र गुन्हे दाखल झाले तरी मोर्चा निघणारच अशी भूमिका आयोजकांनी घेतल्याने या मोर्चाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. संपूर्ण सोलापूर शहरात पोलीस प्रशासनाच्या वतीने संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. दुसरीकडे ग्रामीण भागातून शहराकडे येणारे सर्व रस्त्यांवर पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. अत्यावश्यक कारणाशिवाय सोलापूर शहरात आज कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. सोलापूर जिल्ह्यात जवळपास चार हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज चौकातून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. 

पार्श्वभूमी

सोलापूर : मराठा आरक्षण मिळावे यासाठी सोलापुरात आज मराठा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत हा मोर्चा जाणार आहे. या मोर्चासाठी खासदार छत्रपती उदयनराजे, छत्रपती संभाजीराजे, नारायण राणे, रामदास आठवले यांना निमंत्रण दिलं होतं मात्र यांपैकी कुणीही मोर्चाला येणार नसल्याची माहिती असून नरेंद्र पाटील यांच्याच नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे. 


सोलापूर शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक या ठिकाणाहून सकाळी 11 वाजता मोर्चा सुरू होईल. मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे. तरी आंदोलक मोर्चा वर ठाम आहेत.  जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा जाईल असे सांगण्यात आले आहे. मात्र माहितीनुसार पोलीस चार पुतळा चौकात मोर्चा थांबवतील. शहरात 2 हजार ग्रामीण भागात 2 हजार पोलिसांचा फौजफाटा असणार आहे. शहरात येणारे सर्व मार्गवर नाकेबंदी करण्यात येत आहे. दरम्यान मराठा आक्रोश मोर्चाला सोलापूर शहर पोलीसांनी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे मराठा आक्रोश मोर्चाचे आयोजक राम जाधव, किरण पवार यांना नोटीस देण्यात आली आहे. मात्र असं असलं तरी मराठा आक्रोश मोर्चा काढणारच अशी भूमिका आयोजकांनी घेतली आहे. 


दरम्यान सोशल मीडियावर पोलिसांनी आंदोलनाला परवानगी दिली असल्याचे खोटे संदेश फिरत आहेत. पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिलेली नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने मोर्चा, आंदोलनास मनाई केली आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी केले आहे.


मोर्चाच्या पार्श्वभूमीवर तगडा बंदोबस्त




 



कोरोनाचा संसर्ग पाहता प्रशासनाच्यावतीने या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली आहे. परवानगी नसली तरी मोर्चा काढण्यावर आंदोलक ठाम आहेत. त्यामुळे सोलापुरात आज आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सोलापूर शहरात आज नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरू नये असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे. दुसरीकडे मोर्चाच्या पार्श्वभूमीवर तगडा बंदोबस्त शहर आणि ग्रामीण हद्दीत तैनात करण्यात येणार आहे. सोलापूर शहर आणि ग्रामीण मध्ये जवळपास 4 हजार पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे. तर शहरात येणारे सर्व प्रमुख मार्ग पोलिसांच्या वतीने सील करण्यात येत आहेत. मोर्चा ज्या मार्गाने जाणार आहे त्या संपूर्ण मार्गावर सीसीटीव्ही लावण्यात येत आहेत. बंदोबस्तामध्ये सोलापूर शहर आणि ग्रामीण पोलीस, एसआरपीएफच्या तुकड्या, होमगार्ड, सातारा, सांगली, उस्मानाबाद इत्यादी ठिकाणाहून पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आहे

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.