मुंबई : राज्यात आज अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस (Rain) झालाय. सिंधुदुर्ग, इंदापूर आणि गडचिरोलीसह अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे आंबा आणि द्राक्ष बागायतदारांच्या चिंतेत भर पडली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मदौस चक्रीवादळामुळे कुडाळ, सावंतवाडी आणि वेंगुर्ले तालुक्यातील बहुतांश भागात रिमझिम पाऊस झाला. या पावसामुळे आंबा, काजूला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंबा बागायतदार चिंताग्रस्त आहे. 11 ते 13 डिसेंबरच्या काळात राज्यातील अनेक भागात पाऊस होईल अस अंदाज हवामान खात्याने (India Meteorological Department) वर्तवला होता.
गडचिरोलीत मुसळधार दक्षिण गडचिरोलीतील अनेक तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे जिल्ह्यातील तापमान आणखी घसरले आहे.
इंदापुरात हलक्या सरी रविवारी सायंकाळी सव्वा सातच्या दरम्यान पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस झालाय. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. पावसाचा जोर वाढल्यास पिकांची नासाडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी पुरता धास्तावला आहे.
आणखी तीन दिवस पावसाचा अंदाज
नैऋत्य बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ तयार झाल्याने येत्या तीन दिवसात मेघगर्जनेसह मध्यम हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात वादळ झाल्याने देशातील काही भागात पावसाने थैमान घातले आहे.
राज्यातील मराठवाड्यात बीड, उस्मानाबाद, लातूर, पश्चिम महाराष्ट्रात नाशिक तर पश्चिम महाराष्ट्रात अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. याशिवाय काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असाही अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मेंडोस चक्रीवादळामुळे राज्यात 11 ते 13 डिसेंबरपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
चक्रीवादळाचा परिणाम हा महाराष्ट्रातील मुंबईसह संपूर्ण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यात 9 ते 16 डिसेंबर दरम्यान ढगाळ वातावरण होण्याची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी अवकाळी किरकोळ पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.