जालना : राज्यात सध्या मराठा (Maratha Reservation) आणि ओबीसी आरक्षणाचा (OBC Reservation) मुद्दा चांगलाच तापलेला आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी खळबळजनक वक्तव्य केले. कुणबी मराठा उमेदवाराला मतदान करू नका असं त्यांनी ओबीसींना आवाहन केलंय. तसेच मराठ्यांना ओबीसीमधून आधीच 10 टक्के आरक्षण दिले गेले आहे. मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचा अल्टिमेटम सरकारला दिलेला आहे. त्याबद्दलची भूमिका सरकारने जाहीर करावी. मनोज जरांगे पाटील यांची मागणी यापूर्वीच मान्य झाली आहे. गरीब मराठ्यांना आरक्षण हवं असेल तर त्यांनी आम्हाला सत्ता द्यावी. त्यांना आरक्षण कसे द्यायचे आणि त्यांचं ताट कसं वेगळं ठेवायचं याचा फार्मूला आमच्याकडे आहे. जोपर्यंत आम्हाला सत्ता देणार नाही तोपर्यंत आम्ही हा फार्मूला सांगणार नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. आता प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तर मनोज जरांगेंशी चर्चा करणार का? यावर छगन भुजबळांनी उत्तर दिले आहे. 


मनोज जरांगेंचे प्रकाश आंबेडकरांना प्रत्युत्तर


मनोज जरांगे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. ज्यांना निवडणूक लढवयाची त्यांनी कागदपत्राची तयारी ठेवा. आतापासूनच कागदपत्र काढून ठेवा. सगळ्यांनी ठरलेल्या एकाच उमेदवाराच्या पाठीमागे उभे राहायचे असे त्यांनी म्हटले आहे. प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत मनोज जरांगे पाटील म्हणाले की, हरकत नाही, मी ओबीसीतून आरक्षण घेणार आहे. त्यांना उत्तर कधी दिले नाही आणि यापुढे देखील देणार नाही. ते आता नवीन काय काढायला लागले आहेत. त्यांचे आम्हाला काहीच कळत नाहीये, असे प्रयुत्तर मनोज जरांगेंनी दिले आहे.  


मी बघायला लागल्यावर लय फजिती होईल


मनोज जरांगेंनी आमच्या नेत्यांबद्दल बोलू नये. देवेंद्र फडणवीसांवर बोलू नये. देवेंद्र फडणवीस यांच्यावर जर ते बोलले तर आम्ही बोलणारच. देवेंद्र फडणवीसांवर सतत टीका करणाऱ्या मनोज जरांगेंचा मराठवाड्यात जाऊन आपण समाचार घेणार असल्याचे नारायण राणेंनी म्हटले होते. याबाबत मनोज जरांगेंना विचारले असता ते म्हणाले की, मी त्यांना कधी म्हणलो येऊ नका. मी म्हणलो का दादांनी मराठवाड्यात यायचं नाही. हे मला बघून घेणार म्हणतात ही कोणती धमकी आहे, मला तुम्ही काय बघणार आहे. मला बळजबरी धमकी देता का? मी बघायला लागल्यावर लय फजिती होईल. मी त्यांना मानतो, मी निलेश साहेबांना वेळोवेळी सांगितलं त्यांना समजून सांगावं, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. 


जरांगेंच्या चर्चेबाबत छगन भुजबळांचे स्पष्टीकरण


दरम्यान, मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्यात अनेकदा खडाजंगी उडाल्याचे दिसून आल आहे. त्यातच छगन भुजबळांना मनोज जरांगेंशी चर्चा करणार का? असे विचारले असता त्यांनी थेट उत्तर दिले आहे. जे लोक आरक्षण कशासाठी हे समजतात त्याचे कायदे समजतात त्या कोणाशीही मी बोलण्यास तयार आहे, असे छगन भुजबळांनी म्हटले आहे.  


आणखी वाचा


एकाही कुणबी मराठा उमेदवाराला मतदान करू नका, प्रकाश आंबेडकरांंचं खळबळजनक वक्तव्य, म्हणाले, "इथला कुणबी मराठा डबल.."