Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) विषय संपला की शेतमालाचा भाव आणि धनगर मुस्लिम आरक्षण कसे देत नाहीत हे बघतोच..., असं विधान मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केलं आहे. 2 कोटी पेक्षा जास्त मराठे आता आरक्षणात गेलेत. 25 जानेवारीपासून पुन्हा आमरण उपोषण करणार आहे. मी राहू न राहू याची परवा नाही, असंही मनोज जरांगे यांनी सांगितले. परभणीत मनोज जरांगे बोलत होते.
काही लोक म्हणतात की आता पहिलं सरकार आहे, आरक्षण देतील का?, पण आता खरी मजा आहे, हिशोब चुकता करण्याची... होऊ द्या आता...पहिले हा दुसऱ्यांवर ढकलत होता ना, मी विरोध करत नाही, मी द्या म्हणतो. आता कळेल देतो की नाही ते, असं विधान करत मनोज जरांगेंनी पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
मनोज जरांगे परभणीत-
मनोज जरांगे हे कालपासुन परभणीत आहेत. काल रात्री परभणीच्या दामपुरी गावात ते मुक्कामी होते. त्या ठिकाणी झालेल्या गाव भेट दौऱ्या दरम्यान गावकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला .ज्यात मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केलं. तसेच 25 जानेवारीपासून उपोषण सुरू करणार, मी राहू न राहू पण आरक्षणासाठी लढा देणार आहे. तसेच मराठा आरक्षणाचा विषय मिटला की शेतमालाला भाव हे कसे देत नाही तेही बघतो आणि धनगर आणि मुस्लिम आरक्षण ही कसे मिळत नाही तेही पाहणार असल्याचं मनोज जरांगे म्हणाले आहेत.
मनोज जरांगे आज परभणी आणि मस्साजोगला जाणार-
मनोज जरांगे आज परभणी आणि मस्साजोगला जाणार आहेत. मनोज जरांगे परभणीत सूर्यवंशी कुटुंबीयांची तर मस्साजोगमध्ये संतोष देशमुख कुटुंबीयांचीही सांत्वनपर भेट घेणार आहेत. 28 तारखेला बीड जिल्ह्यातील जनतेच्या वतीने मोर्चा ठेवलेला आहे. त्यातसुद्धा बीड जिल्ह्यातील जनतेने सहभागी व्हावे, असं आवाहन मनोज जरांगेंनी केलं आहे. तसेच कोणाचे पण बाप येऊ द्या ते मॅटर मी दबू देत नाही. कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत मी हटणार नाही. सरकारला एकमेकांना मोबाईलचे फोन केलेले तपासायला एवढे दिवस लागतात का?, असा सवाल मनोज जरांगेंनी उपस्थित केला.
25 जानेवारी 2025 ला कोणीही लग्नाची तारीख धरू नये- मनोज जरांगे
25 जानेवारी 2025 पासून आम्ही अंतरवालीमध्ये आमरण उपोषण सुरू करणार आहोत. 25 जानेवारीच्या आत आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करा, अन्यथा सरकारला भयंकर आंदोलन बघावे लागेल, असा इशारा मनोज जरांगेंनी फडणवीस सरकारला दिलाय. तर 25 जानेवारी रोजी राज्यभरातील मराठ्यांनी अंतरवलीकडे यायचं. मराठ्यांची ताकद पुन्हा एकदा दाखवा. सर्वांनी स्वतः हा मेसेज सोशल मीडियावर पोस्ट करा. हे आंदोलन गरीब मराठ्यांनी हातात घ्यायचे आहे. माझं गाव माझी जबाबदारीप्रमाणे आपणच आपल्या गावात बैठका करायच्या आहेत. सर्वांनी पत्रिका छापायच्या, प्रत्येक घरात जाऊन आमंत्रण द्यायचं. 25 जानेवारी 2025 ला कोणीही लग्नाची तारीख धरू नये, त्या दिवशी वाहानेच मिळणार नाहीत, असे आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला दिले.