मुंबई : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) लढा पुकारलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी निर्णायक लढा पुकारताना मुंबईच्या दिशेनं आजपासून (20 जानेवारी) कूच केलं आहे. मनोज जरांगे यांनी मुंबईच्या दिशेनं कूच केलं असलं तरी मुंबईतील आंदोलनाची जागा अजूनही निश्चित झालेली नाही. मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अद्याप मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे मुंबई पोलिसांकडून परवानगी दिली जाणार की नाही? याकडे आता लक्ष आहे.
मनोज जरांगेंच्या शिष्ठमंडळाकडून आझाद मैदानाची मागणी
दरम्यान, मराठा आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या शिष्ठमंडळाकडून वांद्रे, बीकेसी आणि आझाद मैदानात आंदोलनासाठी परवानगी मिळावी यासाठी अर्ज दाखल केला आहे. तीन मैदांनांपैकी आझाद मैदानाची जागा आंदोलनासाठी निश्चित करण्यात आली होती. त्यासाठी पोलिस परवानगीही मागण्यात आली होती. मात्र, अद्याप जरांगे पाटलांच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी दिलेली नाही.
शिंदे साहेबांना अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न
दरम्यान, शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी मनोज जरांगे यांच्याशी कोणतीच चर्चा न करण्याचे काहीच कारण नसल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, सरकार काम करत आहे. मागासवर्गीय आयोग, शिंदे समिती काम करत नाही का? करतंय, तेलंगाणाला जाऊ देखील आले. नोंदी कोणी काढल्या? याच सरकारनं काढल्या आहेत. तलाठ्यापासून सर्व यंत्रणा काम करत आहे. तुम्ही याला काम म्हणणार नाही का? मुळात आपली मागणी काय? सरकारनं त्यासंदर्भात काम सुरु केलं आहे ना? नंतर ज्या मागण्या येतात त्यामुळे कामाचा ट्रॅक चेंज होतो. मग सरकारला काम करणं अवघड होतं.
ते म्हणाले की, मराठा समाजाला देखील याची जाणीव आहे. मात्र, शिंदे साहेबांना अडचणीत कसं आणायचं असा प्रयत्न काही लोकं करत आहेत आणि त्याला सपोर्ट होत आहे का? असं चित्र निर्माण होतं आहे. यापासून सावध राहिलं पाहिजे. कोणालाही दुखवता कामा नये, अशी सरकारची भूमिका आहे. फेब्रुवारीत सरकार अधिवेशन घेत आरक्षण जाहीर देखील करणार आहे, मग कशाला पाहिजे हे सगळं? जरांगेंचा सरकारच्या भूमिकेला विरोध नाही? मग हा वाद का निर्माण करत आहात? सरकार तुमच्याशी बोलायला तयार असल्याचे ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या