छत्रपती संभाजीनगर - राज्यात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून राजकीय नेतेमंडळी प्रचारात व्यक्त आहेत. तर, मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) हे निवडणुकांच्या राजकारणापासून दूर आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होताच, ते आरक्षणासाठी पुन्हा उपोषणाचं हत्यार उपसणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. दरम्यान, मराठा समाजाच्या गाठीभेटी आणि दौरे सुरू असून बीड जिल्ह्यात त्यांनी लक्ष केंद्रीत केलं आहे. आजही बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मनोज जरांगे यांची तब्येत बिघडली. त्यामुळे, त्यांन तत्काळ बीडमधून छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आलं आहे.  


अचानक तब्बेत खालावल्यामुळे मनोज जरांगे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने गाठीभेटी दौऱ्यात बीड जिल्ह्याचा दौरा सुरू असतानाच अचानक त्यांची तब्येत खालावली. त्यामुळे, मनोज जरांगे बीड दौरा अर्धवट सोडून छत्रपती संभाजीनगर मधील गॅलेक्सी  हॉस्पिटलमध्ये दाखल झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचारही सुरू करण्यात आले आहेत. गतवेळेसप्रमाणे त्यांना अशक्तपणा आला असल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, यापूर्वीही जरांगे पाटील यांना अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळीही, डॉक्टरांनी अशक्तपणामुळे त्यांची प्रकृती खालावली असल्याचे सांगितले होते. उपचारानंतर ते पुन्हा आपल्या मराठा आरक्षणाच्या कार्यात सक्रीय झाले होते.


निवडणूक काळात बीड दौऱ्यावर


लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनोज जरागे यांनी आपलं उपोषण स्थगित केलं असून निवडणुकीत कुठलीही भूमिका घेतली नाही. आपल्या गावभेटी दौऱ्यादरम्यान त्यांनी निवडणूक काळातही थेट भाजपा नेत्यांवर हल्लाबोल केला आहे. तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य केल्याचं दिसून आलं. काही दिवसांपूर्वी बीडमधील भाजपा उमेदवार पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे यांच्यात आरोप-प्रत्यारोप झाल्याची चर्चा माध्यमांत रंगली होती. त्यावेळी, मी मनोज जरांगेंवर टीका केली नसल्याचंही पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलं होतं. वर्षभरात मी मनोज जरांगे पाटलांचं नाव देखील घेतलं नाही. मला ज्याच्यावर बोलायचं आहे मी त्याच्यावर मोठ्या आवाजात बोलते आणि मी जर टीका केली तर कधीच शब्द मागे घेत नाही, मी गोपीनाथ मुंडेंची औलाद आहे. गरिबांसाठी आंदोलन करणाऱ्या जरांगे पाटलावर मी टीका केली नाही. 


हेही वाचा


भाजपला का मतदान करावं?; रात्रीच्या अंधारात मराठा तरुणांनी आमदार महोदयांना घेरलं


मराठा आंदोलनातील आक्रमक चेहरा 'वंचित'ने हेरलाच! नाशिकमधून करण गायकरांना उमेदवारी जाहीर, जळगावात उमेदवार बदलला