Manoj Jarange In Nashik : छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)  ओबीसी समाजाचे नेते असतील तर नाभिक समाजाची माफी मागावी. त्यांनी त्यांचा अपमान केलाय. माफी मागितली नाही, तर त्याचा अर्थ असा होतो जाणूनबुजून अपमान केला, असा खोचक टोला मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केला आहे. ते नाशिकमध्ये (Nashik)  बोलत होते. ओबीसी समाजाने भुजबळांना समज द्यावी, असेही ते म्हणाले. मनोज जरांगे हे आज नाशिक (Nashik) जिल्ह्यातील दिंडोरी, कळवण, बागलाण, मालेगाव, नांदगाव तालुक्याचा दौरा करणार आहेत. विशेष म्हणजे याच दौऱ्यात मराठा समाजाच्या वतीने ठिकठिकाणी जरांगेंचे जल्लोषात स्वागत करत जोरदार शक्तिप्रदर्शन देखील केले जाण्याची शक्यता आहे. याच दौऱ्यात मनोज जरांगे हे साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीचे दर्शनही घेणार आहे. त्यामुळे जरांगे यांचा आजचा नाशिक दौरा चर्चेत आला आहे.


मागील काही दिवसांपासून मनोज जरांगे विरुद्ध छगन भुजबळ असा वाद पाहायला मिळत आहे. दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य करत सरकराने काढलेल्या अध्यादेशाला देखील भुजबळ यांनी विरोध केला आहे. नाशिकमध्ये मनोज जरांगे यांनी भुजबळांवर टीकास्त्र सोडले. 


भुजबळांना टोला -


कोणत्या नेत्याचा बालेकिल्ला कुणाचा नसतो, जनतेचा बालेकिल्ला असतो, असा टोला मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांना लगवला. मराठा क्रांती मोर्चा आज भुजबळांच्या राजीनाम्यासाठी राज्यपालांना भेटणार आहेत.. यावर बोलताना जरांगे म्हणाले की, भुजबळ राजीनामा देणार नाहीत.. ते घ्यायला बसले आहेत. भुजबळांनी राजीनामा द्यावा अथवा नाही.. त्यात मी पडणार नाही. मी इतक्या खालच्या दर्जाला जाणार नाही. छगन भुजबळ यांनी नाभिक समाजाची माफी मागावी. ओबीसी समाजाचा नेता असेल तर माफी मागावी, असे मनोज जरांगे म्हणाले. ते सुद्धा गोरगरिब आहेत. त्यांनी त्यांचा अपमान केलाय. त्यांची माफी मागावी. माफी मागितली नाही, त्याचा अर्थ असा होतो जाणूनबुजून अपमान केला. माफी मागणार नाही, असा खोचक टोला यावेळी जरांगेंनी लगावला.



मनोज जरांगेंचा पुढील तीन दिवसांचा दौरा...


8 फेब्रुवारी 2024 : दादर मुंबईतून- नाशिक मार्गे- सटाणा मार्गे साल्हेर किल्ला येथे सकाळी 11 वाजता नियोजित कार्यक्रम. त्यानंतर सान्हेर किल्याहुन छत्रपती संभाजीनगर मार्गे- आंतरवाली सराटी.


9 फेब्रुवारी 2024 : आंतरवालीहून– भोगलगाव (जिल्हा-बीड) येथे सकाळी 10 वाजता नियोजित कार्यक्रमला उपस्थित राहणार. त्यानंतर भोगलगावहून – बीड मार्गे- कोळवाडी (मांजरसुबा घाट) येथे दुपारी 12 वाजता नियोजित कार्यक्रमला उपस्थित राहणार. त्यानंतर कोळवाडीहून बीड - गेवराई मार्गे - आंतरवाली सराटी.


10 फेब्रुवारी 2024 : आंतरवाली सराटी येथे सकाळी 10 वाजता महत्वाची बैठक व त्यानंतर मनोज  जरांगे पाटिल यांचे आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला सुरुवात होणार आहे.