नाशिक : एकीकडे वाहन क्षेत्रात मंदी असल्याचं बोललं जात असताना दुसरीकडे मात्र एकाच दिवशी कळवण तालुक्यातील शेतकऱ्यांनी 250 ट्रॅक्टर एकाच दिवशी विकत घेतले आहेत. याची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. नाशिक जिल्ह्यातील आदिवासी पट्टा असलेल्या कळवण तालुक्यात शेतकऱ्यांनी नवरात्रीच्या पहिल्या माळेला विविध ट्रॅक्टरच्या शो रुममधून आपल्या आवडीचे ट्रॅक्टर्सची खरेदी केली आहे.

दुष्काळी परिस्थिती असली तरी कळवण तालुक्यात शेतकऱ्यांनी चांगल्या पध्दतीने उन्हाळी कांद्याची लागवड केली आणि टप्प्याटप्प्याने कांदा विक्री केली.  या तालुक्यातील शेतकऱ्यांनी बऱ्यापैकी चाळीत कांदा साठवणूक केलेला असल्याने त्याचा फायदा त्यांना झाला. पावसाच्या वाढत्या प्रमाणामुळे परराज्यात कांद्याची कमतरता निर्माण झाली आणि नाशिक जिल्ह्यातील कांद्याला मागणी वाढली.

त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून उन्हाळी कांद्याला 5000 ते 4000 हजार रुपयांपर्यंत दर मिळाल्याने शेतकऱ्यांना खूप वर्षानंतर हाती चांगले पैसे मिळाले. त्यामुळे कळवण तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी अण्णासाहेब पाटील महामंडळ तर काही शेतकऱ्यांनी खाजगी फायनान्सच्या माध्यमातून ट्रॅक्टर तर काहींनी कार खरेदी केल्या आहेत.

कांदा विक्रीतून मिळालेल्या पैशातून शेतकऱ्यांनी ही खरेदी केली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितलं आहे. पहिल्या माळेच्या एकाच दिवशी विविध शोरुममधून खरेदी करणाऱ्या शेतकऱ्याचे जंगी स्वागत त्या त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी रेड कार्पेट टाकून केले. तसेच ट्रॅक्टर खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांचा फेटा बांधून सत्कार केले. शिवाय या शेतकऱ्यांना जेवणाची पंगत देण्यात आल्याचं बोललं जात आहे. एकीकडे देशात वाहन क्षेत्रात मंदी आल्याच बोलले जात असताना दुसरीकडे एकाच दिवसात 250 शेतकऱ्यांना सबसिडी, फायनान्सच्या माध्यमातून वाहन खरेदी करत असल्याच पाहावयास मिळत आहे.

सध्या कांद्यावर निर्यात बंदी करण्यात आली असली तरी कांद्याच्या दर आजही 3000 हजाराच्या आसपास आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे बऱ्यापैकी कांदा साठवणूक केलेला आहे. त्या शेतकऱ्यांनी दसऱ्याला ट्रॅक्टर, कार खरेदीसाठी बुकींग केल्याचं सांगण्यात येतं आहे.