मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसेला मोठा धक्का बसला आहे. धडाकेबाज आणि खळ्ळं खट्याक स्टाईल आंदोलनासाठी प्रसिद्ध असलेले मनसेच्या वाहतूक सेनेचे सरचिटणीस नितीन नांदगावकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नितीन नांदगावकर यांनी हातात शिवबंधन बांधलं.


नितीन नांदगावकर हे विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. परंतु त्यांना उमेदवारी मिळाली नाही. अखेर त्यांनी मनसेला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. बुधवारी (2 ऑक्टोबर) रात्री मातोश्रीवर त्यांचा शिवसेनेत प्रवेश झाला. नितीन नांदगावकर यांचा शिवसेना प्रवेश मनसेसाठी मोठा धक्का समजला जात आहे.

मनसेकडून 45 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, आदित्य ठाकरे, शेलार यांच्यांविरोधात उमेदवार नाही?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे खंदे समर्थक असलेले नितीन नांदगावकर 2010पासून राजकारणात सक्रीय आहेत. नितीन नांदगावकर यांना सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोईंग आहे. अनोख्या स्टाईलने त्यांनी अनेकांना न्याय मिळवून दिला होता. तसंच फेसबुकवर त्यांनी जनतेच्या प्रश्नासंबंधीचे, अवैध वाहन चालवणाऱ्यांना शिक्षा करण्याचे, फसवणूक करणाऱ्यांचे, वयोवृद्धांना न्याय दिल्याबाबतचे अनेक व्हिडीओ अपलोड केले आहे. त्यांचे हे व्हिडीओ कायमच तुफान शेअर होत असतात.