नागपूर : एका महिलेच्या घराजवळ बसून मोबाईलवर जोराजोरात संभाषण करणं आणि संभाषणात शिव्यांचा वापर करणे एका तरुणाला महागात पडलं आहे. कारण संबंधित महिलेने गुंडांकडून त्या तरुणाची हत्या केली. गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या लिकेश साठवणे नावाच्या तरुणाचा मृतदेह सापडला असून, हत्येमागच्या कारणाने खळबळ उडाली आहे.
लिकेश साठवणे याचा मृतदेह काल (17 एप्रिल) दुपारी वाठोडा परिसरात एका निर्जन ठिकाणी विहिरीत सापडले. ऑटो चालक असलेला 25 वर्षांचा लिकेश गेले आठ दिवस बेपत्ता होता आणि पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र, आज त्याचा मृतदेह सापडल्यानंतर त्याची हत्या झाल्याचे उघड झाले.
चार महिन्यांपूर्वी पवनशक्ती नगरात एका सार्वजनिक बेंचवर बसलेल्या लिकेशचे जया शर्मा नावाच्या महिलेसोबत भांडण झाले होते. तेव्हा लिकेश मोबाईल फोनवर जोराजोरात बोलत होता आणि शिव्याही देत होता. त्यामुळे जया शर्मा आणि लिकेश यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. तेव्हा झालेला भांडण लिकेश विसरला होता. मात्र, इराने पेटलेल्या जया शर्माने लिकेश सोबत झालेल्या भांडणाचे सूड घेण्याचे ठरवले होते.
तिने ओळखीतल्या गोपाळ बिसेनला लिकेशला संपवण्याची जबाबदारी दिली. त्यासाठी काही हजारांची रोकडही दिली आणि गुंड प्रवृत्तीच्या गोपाळने प्रफुल्ल गेडामच्या मदतीने 9 एप्रिल रोजी लिकेशला वाठोडा परिसरात निर्जन ठिकाणी नेऊन चाकू भोसकून संपविले आणि त्यानंतर त्याचा मृतदेह एका विहिरीत फेकून दिला.
लिकेशच्या आईने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशय असलेल्या गोपाळ बिसेनला ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवला आणि त्यानंतर गणेश बिसेनने हत्या केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी या प्रकरणात गोपाळ बिसेनला अटक केली असून सुपारी देणारी जया शर्मा आणि प्रफुल्ल गेडाम फरार झाले आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.