सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील मालवण किल्ले विक्री प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे. मालवण किल्ल्याकडे शासनानं दुर्लक्ष केल्यामुळे 'किल्ला विकणे आहे' असा बोर्ड लावल्याचा दावा स्थानिक रहिवाशाने केला आहे.


वारंवार शासनाकडे अर्ज-विनंत्या करुनही त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. त्यामुळे उपरोधिक पद्धतीनं बोर्ड लावून शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केल्याचंही सिद्धार्थ सकपाळ या रहिवाशानं म्हटलं आहे. कोणत्याही समाजाच्या वा जातीच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, असं स्पष्टीकरणही त्याने दिलं आहे.

'किल्ला विकणे आहे'च्या बॅनरने संताप, मालवण बंदची हाक


‘किल्ला विकणे आहे’ अशा प्रकारचा बॅनर मालवण किल्ल्याबाहेर लावण्यात आल्यानं स्थानिकांचा संताप झाला होता. याचा विरोध करण्यासाठी ‘मालवण बंद’ची हाक देण्यात आली होती. त्यामुळे ऐन उन्हाळ्याच्या सुट्टीत
आलेल्या पर्यटकांचे हाल होण्याची शक्यता आहे.

सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि प्रेरणोत्सव समितीनं हा बंद पुकारला आहे. किल्ला विक्रीचा फलक लावणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. राजाराम कानसे, सुमित कवटकर, प्रसाद कवटकर अशी या तिघांची नावं आहेत. तिघंही जण सिंधुदुर्गातलेच रहिवासी आहेत. तर नितीन शिर्सेकर हा फरार झाल्याची माहिती आहे.

मालवण बंदमध्ये होडी व्यावसायिक आणि स्कुबा व्यावसायिकही सहभागी होणार आहेत. सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्यामुळे मालवणमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असते. त्यामुळे आजच्या बंदमुळे पर्यटकांची गैरसोय होण्याची चिन्हं आहेत.