बीड : बीडमधल्या एका महामार्गावर दोन दुचाकींच्या अपघातानंतर एका बाईकने पेट घेतला. त्या आगीत बाईकस्वारही होरपळत होता, मात्र खेदाची गोष्ट म्हणजे एकही वाहनचालक त्याच्या मदतीसाठी थांबला नाही. उलट बघे घटनेचा व्हिडिओ काढत बसले. त्यामुळे अपघातात बाईकस्वारासोबतच माणुसकी आणि संवेदनशीलतेचाही मृत्यू झाला. 'एनडीटीव्ही'ने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.


अपघातानंतर पेटलेल्या बाईकचा आणि दुचाकीस्वाराचा व्हिडिओ समोर आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार बीड जिल्ह्यातील महामार्गावर गुरुवारी हा व्हिडिओ काढण्यात आला. दुचाकींची एकमेकांना धडक बसल्यानंतर एक बाईकस्वार गंभीर जखमी झाला, तर दुसऱ्या बाईकने जागीच पेट घेतला.

दुर्दैवाने तो बाईकस्वार दुचाकीखाली अडकून बेशुद्ध पडल्याने त्याला जीव वाचवण्यासाठीही वेळ मिळाला नाही. पोलिस घटनास्थळी दाखल होऊन आग विझवेपर्यंत तो गंभीर भाजला होता. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, त्यावेळी त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. बाईकस्वाराची ओळखही पटू शकलेली नाही.

गंभीर गोष्ट म्हणजे वाहता रस्ता असूनही एकही गाडी त्याच्या मदतीसाठी थांबली नाही, किंवा एखाद्या पादचाऱ्यालाही त्याला मदत करावीशी वाटली नाही. उलट बघ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये घटनेचं चित्रीकरण करण्यात धन्यता मानली.

दोन्ही बाईकस्वारांपैकी कोणाकडे मद्य होतं का, याचा तपास पोलिस करत आहेत. अल्कोहोलमुळे आग लवकर भडकल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मृताची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे. नंबर प्लेटही जळली असून बाईक परभणीत रजिस्टर असल्याची माहिती आहे. जखमी बाईकस्वारावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.