बुलढाणा : वैद्यकीय शिक्षणासाठी महत्वाची मानली जाणारी नीट परीक्षा रविवारी 12 सप्टेंबर रोजी पार पडली. या परीक्षेदरम्यान बुलढाण्याच्या एका परीक्षा केंद्रावरील गैरप्रकार समोर आला. ऑफलाईन घेण्यात आलेल्या नीट परीक्षेची उत्तर पत्रिका परीक्षा संपल्यानंतरही परीक्षा केंद्राबाहेर तब्बल एक तास विद्यार्थ्यांकडेच असल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक प्रकार समोर आल्यावर परीक्षा केंद्र असलेल्या जांभरुळ येथील तोमई इंग्लिश शाळेनं विद्यार्थ्यांकडे असलेल्या उत्तरपत्रिका तत्काळ परीक्षा केंद्रात जमा केल्या. याप्रकरणी अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता, अधिकाऱ्यांनी सारवासारव केली.
नीट परीक्षेत झालेला हा गैरप्रकार अनेक उत्तर पत्रिकांबाबतीत झाला तर नाही ना? असा संशय निर्माण होत आहे. तसेच नीट परीक्षेतील गुण वाढविण्यासाठी हा गैरप्रकार झाला असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे नीटची परीक्षा देणाऱ्या परिक्षार्थ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी परीक्षार्थ्यांना पहिली नीट परीक्षा देणं बांधकारक आहे. परीक्षेमध्ये चांगले गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेता येतं. विशेष म्हणजे, परीक्षेत मेरिट गुण प्राप्त करणाऱ्यांना सरकारी कोट्यामधून निशुल्क आणि काही शुल्क भरून वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण प्राप्त करता येतं. त्यानंतर वैद्यकीय शिक्षणानंतर वैद्यकीय पदवी प्राप्त करता येते. ही परीक्षा अत्यंत महत्वाची असून परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्रावर कडक नियमावली लागू केली जाते. या नियमांचं काटेकोर पालन करणंही बंधनकारक असतं.
परीक्षा केंद्राबाहेर गेलेल्या उत्तर पत्रिकेची चौकशी होणं गरजेची
रविवारी 12 सप्टेंबर रोजी देशासह राज्यात विविध परीक्षा केंद्रांवर एकाच दिवशी, एकाच वेळी ऑफलाईन नीटच्या परीक्षा घेण्यात आल्या. बुलढाणा जिल्ह्यात देखील नीटच्या परीक्षा घेण्यात आल्या. सदर परीक्षा केंद्रांवर काटेकोरपणे नियमावली जाहीर करून कुठल्याच प्रकारचा गोंधळ किंवा गैरप्रकार होऊ नये, यासाठी दक्षता ठेवण्याचे आदेश होते. बुलढाणा शहरात देखील सहकार विद्या मंदिर, श्री शिवाजी विद्यालय आणि जांभरुळ येथील तोमई इंग्लिश शाळेच्या परीक्षा केंद्रावर नीटच्या परीक्षा घेण्यात आल्या. जांभरुळ येथील तोमई इंग्लिश शाळेच्या परीक्षा केंद्रावर 1 पासून 12 खोल्यांत 120 परीक्षार्थ्यांनी नीटची परीक्षा दिली. संध्याकाळी 5 वाजता परीक्षा संपल्यावर खोली क्र. 9 मधील एका परीक्षार्थ्याची उत्तर पत्रिका केंद्राबाहेर गेली. हा प्रकार समोर आल्यानंतर याबाबतची माहिती विचारल्यावर तोमई इंग्लिश शाळेच्या परीक्षा केंद्रावरील उपस्थित केंद्रप्रमुख आणि कर्मचाऱ्यांनी सारवासारव करून तब्बल एका तासानंतर उत्तर पत्रिका परीक्षा केंद्रावर जमा करुन घेतली. यावेळी हा सर्व प्रकार केमरात कैद झाला, तब्बल एक तास नीट परीक्षेची उत्तर पत्रिका बाहेर असल्यामुळे असा प्रकार अशा अनेक उत्तर पत्रिकेबाबत झाला तर नाही ना? असा संशय निर्माण होत आहे.
ती उत्तर पत्रिका नव्हे तर उत्तर पत्रिकेची कार्बन कॉपी
तोमई इंग्लिश शाळेच्या परीक्षा केंद्रावरून नीटची उत्तर पत्रिका एक तास केंद्राबाहेर गेली होती. या प्रकाराबाबत विचारल्यावर, "परीक्षा संपल्यावर एका चांडोलच्या एका परीक्षार्थ्याच्या चुकीनं जी शाळेत जमा असते ती उत्तर पत्रिकेची कार्बन कॉपी सोबत नेली होती. ती त्याच्याकडून जमा करण्यात आली आहे. जी कॉपी जमा करण्यात आली आहे. ती नीटची मूळ उत्तरपत्रिका नव्हती तर उत्तर पत्रिकेची कार्बन कॉपी होती." अशी माहिती तोमई इंग्लिश शाळेचे परीक्षा केंद्र प्रमुख अजय जवंजाळ यांनी दिली आहे.